Mon, Jul 22, 2019 13:48होमपेज › Pune › १९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षांच्या पुरुषासोबत विवाह

१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षांच्या पुरुषासोबत विवाह

Published On: Apr 21 2018 3:38PM | Last Updated: Apr 22 2018 1:13AMपिंपरी : प्रतिनिधी

वडिलांपेक्षा जास्त वय असणारा पती... होणार्‍या पतीला चौदा वर्षाची मुलगी... वंशाचा दिवा पाहिजे असल्याने दुसर्‍या लग्नाची अपेक्षा... मोठी स्वप्ने दाखवल्याने आई-वडिलांच्या डोक्यात खूळ... पुण्यात आलिशान फ्लॅट मिळणार, कर्ज फेडणार ही पीडित आई-वडिलांची समजूत... यातूनच पोटच्या 19 वर्षीय मुलीचे इच्छेविरुद्ध 46 वर्षीय व्यक्तीशी लावून दिलेला विवाह. हा सगळा धक्‍कादायक प्रकार सांगवी येथे उघडकीस आला आहे. पीडित मुलीने आई-वडिलांसह पंधरा जणांविरुध्द पोलिसांकडे तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी दीप्ती गायकवाड (19, रा. जुनी सांगवी) हिने फिर्याद दिली आहे, तर आई अनिता गायकवाड (36), वडील दयानंद गायकवाड (46),  शामा मच्छिंद्र माने (54), मच्छिंद्र माने (46), रवी माने (29) शामल रवी माने (25 रा. पटेकर चाळ, ढोरगल्ली), रूपाली राहुल भांडळे (30), राहुल भांडळे (31), उत्तम विठ्ठल काळे आणि इतर सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई-वडिलांनी  दीप्तीचे लग्न तिच्या परस्पर ठरवले. त्या लग्नास तिचा विरोध होता. दीप्तीने नवर्‍या मुलालाही पाहिलेले नव्हते. ‘स्थळ आहे, तुला लग्न करायचे आहे’, असे सांगून तिला जबरदस्तीने गाडीत बसवून तेरखेड येथे नेले. तिथे पती म्हणून उत्तम काळे याला दाखविले. होणारा नवरा वडिलांपेक्षा वयाने मोठा असल्याचे दिसल्याने तिने लग्नास विरोध केला. त्यावेळी तू लग्नास नकार दिल्यास तुला बघून घेईल,’ अशी धमकी देण्यात आली. 22 मार्च 2018 रोजी दीप्तीचे आळंदी येथे जबरदस्तीने लग्न लावून दिले. 20 एप्रिलला दीप्ती हिने सांगवी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सांगवी पोलिस करीत आहेत.