Wed, Apr 24, 2019 07:42होमपेज › Pune › पाच महिन्यांत ४३७ किशोरवयीन बेपत्ता

पाच महिन्यांत ४३७ किशोरवयीन बेपत्ता

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 1:03AMपुणे :  प्रतिनिधी 

घरगुती कारणावरून, मौजमजेसाठी आणि प्रेमात रंगून भुर्रर्र होणार्‍या  किशोरवयीन मुलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात 1 ते 10 वर्षे वयातील दरदिवसाला किमान 3 मुले-मुली बेपत्ता होत असून जानेवारी ते मे 2018 या काळात 437  मुले बेपत्ता झाल्याचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेेले आहेत.मागील महिन्यातच पुण्याच्या पोलिस आयुक्तांना अशाच एका प्रकरणात उच्च न्यायालयासमोर हजर राहावे लागले होते. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणांचा तपास गांभीर्याने केला जात नसल्याचे पुढे आले आहे. 

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहरात पालकांचा प्रेमाला असलेेला विरोध झुगारत पळून जाणार्‍या किशोरवयीन मुलांची संख्या वाढत आहेत. एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार  104 अपहृत मुलांपैकी 86 तर 245 मुलींपैकी 148 मुली मिळून आल्या आहेत. तर मे महिन्यात 1 ते 18 वयोगटातील 6  मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.  14 ते 18 या वयातील मुलींना फूस लावून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून  आणि लग्नाच्या बहाण्याने पळवून नेले जाते.  नकळत्या वयात मुली मुलांसोबत पळूनही जातात. पालक पोलिसांकडे धाव घेतात.

मात्र, पोलिसांकडून पळून जाण्याच्या प्रकरणांची  गांभीर्याने दखल घेतली जात नाही. मुले स्वत:हून पळून गेली आहेत. मग, ती परतही येतील, असे पोलिसांचे म्हणणे असते. मागील काही आठवड्यांपूर्वी सराईत गुन्हेगार श्‍वेतांग निकाळजे याने एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी पोलिसांना त्याचा ठावठिकाणा सांगूनही  पकडले नाही. या प्रकरणात वडिलांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर सहपोलिस आयुक्तांनाच न्यायालयासमोर हजर राहावे लागले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले.  मागील वर्षी मुंढवा परिसरातील एका सतरा वर्षीय मुलीला पळवून नेणार्‍या तरुणालाही तिच्या आईने पोलिस आयुक्तांपर्यंत धाव घेतल्यावर ताब्यात घेतले. 

मुलांचे भविष्य धोक्यात...

अल्पवयीन मुला-मुलींना पळवून नेणार्‍याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. प्रेमप्रकरणातून पळवून नेल्यानंतर मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. तर त्यांच्यात शारीरिक संबंध आल्यास त्याच्यावर पॉक्सो (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम)नुसार गुन्हा दाखल होतो. असा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने मुलांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण होतो. मुलीशीही नंतर कोणी लग्न करण्यास तयार होत नाही. त्यामुळे पालकांची चिंता तर वाढतेच; परंतु त्यांचे स्वत:चे भवितव्यही धोक्यात येते. त्यामुळे आपला मुलगा, मुलगी काय करतात, कुठे जातात, त्यांचे मित्र कोण आहेत, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. अल्लड वयात भरकटलेल्या मुला-मुलींना पालकांनी समज देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

पोलिस ठाणे स्तरावर वेगवेगळे गुन्हे दाखल होतात. त्यात पळून जाणारी काही मुले-मुली  घरी स्वत:हून परतात. मात्र काहीवेळा ती परतत नाहीत. पोलिसांकडूनही त्यांचा माग काढला जातो.  मात्र ती सापडत नसली की पालक पुन्हा आक्रमक होतात, असे एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.