Wed, Mar 27, 2019 01:57होमपेज › Pune › विशेष विवाहांतर्गत जुळल्या ४,३५२ लग्नगाठी 

विशेष विवाहांतर्गत जुळल्या ४,३५२ लग्नगाठी 

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 31 2018 2:06AMपिंपरी ः पूनम पाटील

हल्लीच्या काळात योग्य जोडीदार मिळणे अवघड झाले असून, मनासारखा जोडीदार मिळाला तर आजही समाजाची व जातीपातीची बंधने आड येत आहेत; मात्र समाजाच्या भीतीने लग्नात अडसर निर्माण होत असेल, तर अशा परिस्थितीत विशेष विवाह कायद्याचा आधार घेत पुणे जिल्ह्यात मागील वर्षभरात 4352 जोडप्यांनी विवाह करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

पुणे, पिंपरी चिंचवडसह मागील वर्षभरात जाती-धर्माची बंधने झुगारून विशेष विवाह कायदा 1954 अन्वये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत पुणे जिल्ह्यात 4352 विशेष विवाह पार पडले. यामुळे वेळेची; तसेच पैशांचीही बचत झाल्याची माहिती या जोडप्यांनी दिली आहे. या जोडप्यांनी जाती-धर्माची बंधने झुगारत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. या विवाहासाठी केवळ 150 रु खर्च येतो. या विवाहासाठी नोटीस दिल्यानंतर एक महिन्यानंतर व 90 दिवसांच्या आत विशेष विवाहाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. त्यामुळे मनपसंंत जोडीदार मिळाला असल्याच्या भावना या वेळी विशेष विवाहांतर्गत विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांंंनी व्यक्त  केल्या. 

 1954 या कायद्यांतर्गत विवाह करताना वधू-वर यांना कुठल्याही जाती किंवा धर्माचे बंधन नाही. हा विवाह करू इच्छिणारा अविवाहित असावा किंवा विवाहित असल्यास पुर्वीच्या लग्नबंधनातून कायदेशीररीत्या मुक्त असावा. हा विवाह करण्यासाठी विशेष विवाहाची नोटीस देण्यात येते. वधू-वर या दोघांपैकी किमान एक पक्षकार नोंदणी विवाह करणार्‍या अधिकार्‍याच्या कार्यकक्षेत एक महिन्याच्या कालावधीसाठी वास्तव्यास असावा, महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा मुख्यालयात या कायद्यानुसार विशेष विवाह अधिकार्‍यांमार्फत हे विवाह पार पाडण्यात येतात. एक महिना आधी विवाहेच्छूंनी या विवाहाची रीतसर नोटीस द्यावी लागते. या विवाहास कोणाची हरकत असेल, तर तीस दिवसांत लेखी हरकत नोंदवू शकतो. नसल्यास एक महिन्यानंतर विवाह करण्यात येतो; परंतु हरकत असेल, तर नकार मिळतो. यावर संबंधित व्यक्ती जिल्हा न्यायालयात दाद मागू शकते; परंतु विवाहेच्छू हे सज्ञान असल्याने शक्यतो अशा अडचणी उद्भवत नसल्याची माहिती अधिकार्‍यांच्या वतीने देण्यात आली. 

जातीय निर्मूलनासाठी विशेष विवाह उपयुक्त

पुणे जिल्ह्यांतर्गत मागील वर्षभरात आजवर विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत 4352 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. जातीय निर्मूलन व सामाजिक तेढ दूर करण्यासाठी हा विवाह साह्यभूत ठरत असून, ही काळाची गरज आहे. 
    - ए. के. नंदकर, विशेष विवाह अधिकारी, पुणे जिल्हा, पुणे