Tue, Apr 23, 2019 05:46होमपेज › Pune › एका दूरध्वनीवर वगळले 43 खेळ

एका दूरध्वनीवर वगळले 43 खेळ

Published On: Jun 09 2018 1:51AM | Last Updated: Jun 09 2018 1:40AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने क्रीडापटू आणि क्रीडा संघटनांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शालेय स्पर्धांमधून तब्बल 43 खेळ वगळले आहेत. मंत्रालयातून आलेल्या एका दूरध्वनीवरून हे खेळ तडकाफडकी वगळले असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. याबाबत बाऊंडलेस स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागविली होती. हे खेळ 2018-19 च्या वर्षात पुन्हा सन्मानाने घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

क्रीडा क्षेत्राला पुढे आणण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर विविध उपक्रम राबविण्याचा ध्यास शासनाने घेतला आहे. एकीकडे ‘खेलो इंडिया’चा नारा तर दुसरीकडे केंद्रीय क्रीडामंत्री सोशल मीडियाद्वारे डिप्स मारून ‘फिट इंडिया’चा संदेश देत क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु दुसर्‍या बाजूने राज्य शासनाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धांमधून 43 खेळ वगळले जातात, हा क्रीडापटूंच्या भवितव्याशी खेळ खेळला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

या शालेय क्रीडा स्पर्धा गावपातळीपासून देश पातळीपर्यंत संघटना उभ्या करुन, विविध मान्यतेसाठी आटोकाट प्रयत्न केले. अनेक कागदपत्रांची पूर्तता करुन भारतीय शालेय खेल महासंघाकडून मान्यता मिळविली व शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आपापल्या क्रीडा क्षेत्राचा समावेश करुन घेतला. शासनाने सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर मागील तीन वर्षासाठी मान्यता देऊन, सलग तीन वर्षे या विविध क्रीडा स्पर्धांना शालेय जिल्हा व राज्यस्तरावर प्राधान्य देऊन चौथ्या वर्षापासून सर्व शासकीय सुविधांमध्ये या विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना सर्व लाभ दिला जाईल, असे तोंडी आश्‍वासनही देण्यात आलेले होते, अशी माहिती ही भिंगारे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, 41 संघटनांना शासनाकडून कोणतीही सूचना अथवा पत्रव्यवहार न करता शासनाकडूनच प्राप्‍त झालेल्या दूरध्वनी संदेशावरून हे 43 खेळ शालेय क्रीडा स्पर्धांमधून वगळण्यात आले असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन 2018-19 मधील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये पुन्हा या खेळांचा समावेश करावा, अन्यथा खेळाडूंसह प्रशिक्षक आणि क्रीडा संघटना तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही भिंगारे यांनी यावेळी दिला.