होमपेज › Pune › सिंहगड रस्त्यावर ८ तासांत ४२ हजार वाहनांचे पार्किंग

सिंहगड रस्त्यावर ८ तासांत ४२ हजार वाहनांचे पार्किंग

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 12:54AMपुणे : पांडुरंग सांडभोर

शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंग होणार्‍या वाहनांची संख्या किती प्रचंड आहे, हे महापालिकेने केलेल्या सर्व्हेतून समोर आले आहे. सिंहगड रस्त्यावर 8 तासांत तब्बल 42 हजार वाहनांचे पार्किंगची संख्या नोंदविली गेली आहे. जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर दररोज 20 ते 25 हजार वाहने पार्किंग होत असल्याचे या सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. शहरातील वाहतूक कोंडीला पार्किंगच कारणीभूत ठरत असल्याचे यातून अधोरेखित होत आहे.

महापालिकेने शहरात पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  पहिल्या टप्प्यात शहरातील पाच रस्त्यांवर ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने शहरातील 31 रस्त्यांवरील पार्किंगचा सर्व्हे करून यादी निश्‍चित केली आहे. या सर्व्हेने रस्त्यांवर होणार्‍या वाहनांच्या पार्किंगची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या सर्व्हेत साधारण दिवसभरात 8 तासांत रस्त्यांवर किती दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे पार्किंग होते याची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सध्या वाहतूक कोंडी मोठी समस्या असलेल्या सिंहगड रस्त्यांवर 8 तासांत तब्बल 42 हजार 505 वाहनांच्या पार्किंग होत असल्याचे आढळून आले. त्यात  दुचाकींची संख्या 24 हजार 149 इतकी आहे. त्यापाठोपाठ नेहरू रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यावर 38 हजार 194 वाहनांची नोंद झाली, तिसर्‍या क्रमाकांवर कर्वे रस्त्याचा समावेश असून या रस्त्यावर 26 हजार 276 हजार वाहने पार्किंग होत असल्याचे आढळून आले. 

यामध्ये सर्वाधिक कमी पार्किंगची नोंद प्रभात रस्त्यावर झाली असून, या ठिकाणी केवळ 292 वाहने आढळून आली आहेत. यामध्ये दुचाकी 137 तर चारचाकी 126 वाहने आहेत. दरम्यान, या पार्किंगमध्ये चारचाकी वाहनांचे प्रमाण 30 टक्के तर, दुचाकींचे प्रमाण 70 टक्के इतके असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पार्किंगच्या या आकडेवारीने रस्त्यांवरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रमुख रस्ते व पार्किंगची आकडेवारी

• सिंहगड रस्ता -  42 हजार 505
• नेहरू रस्ता    -   38 हजार 194
•  कर्वे रस्ता      - 24 हजार 001
• सातारा रस्ता   -  26 हजार 276
• शिवाजी रस्ता   - 22 हजार 378
• पौड रस्ता  -        20 हजार 767
• लक्ष्मी रस्ता -    19 हजार 166
•  बिबवेवाडी  रस्ता - 17 हजार 575
• जंगली महाराज   - 17 हजार 458
•  बाजीराव रस्ता   - 16 हजार 139