Thu, Jul 18, 2019 17:02होमपेज › Pune › हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट; अग्निशमन जवानासह चौघे जखमी

हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट; अग्निशमन जवानासह चौघे जखमी

Published On: Jul 04 2018 7:31AM | Last Updated: Jul 04 2018 7:31AMपुणे  : प्रतिनिधी

सातारा रस्त्यावर सिटीप्राईड जवळील हॉटेल मैहफिलमध्ये रात्री अकराच्या सुमारास (मंगळवार) आगीची घटना घडली. तेव्हा तेथील भटारखान्यामधे असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्निशमन दलाचे तांडेल या पदावर असलेले किसन गोगावले(५५) व हॉटेलचे चार कर्मचारी आगीची झळ बसल्याने जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  भटारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु असताना दलाचे तांडेल किसन गोगावले व जवान चंद्रकांत गावडे हे लिकेज झालेला सिलेंडर घेऊन बाहेर  काढताना गॅसचा स्फोट झाला. तेव्हा तिथे असलेले जवान विनायक माळी, दिगंबर बांदिवडेकर, मनीष बोंबले यांनी गोगावले व गावडे यांना तेथून बाहेर काढले. परंतू, तांडेल गोगावले यांना आगीची झळ बसल्याने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लिकेज झालेला सिलेंडर जवानांनी वेळीच बाहेर काढल्याने मोठा धोका टळला. अन्यथा अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अनर्थाला सामोरे जावे लागले असते. आता आग पुर्णपणे विझली असल्याची माहिती समजते.

हॉटेलमध्ये आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर कात्रज व मुख्यालयातून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच आगीमुळे चार कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेल्याचे जवानांना समजले. हॉटेलचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे तांडेल गोगावले यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती दलाच्या जवानांनी दिली. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती दलाचे अधिकारी घेत असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.