Wed, Jul 17, 2019 20:59



होमपेज › Pune › राज्यात आढळले ३८४ कॅन्सरचे रुग्ण

राज्यात आढळले ३८४ कॅन्सरचे रुग्ण

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 16 2018 1:22AM



पुणे : प्रतिनिधी

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केलेल्या मौखिक आरोग्य तपासणी अभियान राबवले होते. यामध्ये राज्यातील पावणेतीन लाख जणांची तपासणी केली असता त्यापैकी 384 रुग्णांना तोंडाचा कॅन्सर (कर्करोग) झाला असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी 347 रुग्णांवर उपचार सुरू असून 7 रुग्णांचा उपचारही पूर्ण झाला आहे. 

राज्यात तंबाखू खाण्याचे तसेच तंबाखूजन्य इतर व्यसनांमुळे तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. हे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. मौखिक कर्करोगाचा वेळेत निदान व उपचार व्हावे, यासाठी राज्यात सर्व ठिकाणी ही तपासणी मोहीम गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पूर्ण महिना राबविण्यात आली. राज्यातील 30 वर्षावरील स्त्री व पुरुषांची तपासणी सर्व शासकीय, महापालिका, नगरपालिका दवाखाने येथे मोफत केली गेली. तर गाव पातळीवर आशा कार्यकर्ती, एएनएम व एमपीडब्लू यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली.

त्यामध्ये राज्यात एकूण दोन लाख 73 हजार 336 कर्करोग संशयित रुग्णांना मोठ्या शासकीय रुग्णालयात संदर्भित करण्यात आले होते. यापैकी जून अखेर 1646 रुग्णांची बायोप्सी तपासणी करण्यात आली असता त्यातून 384 रुग्णांना तोंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. तर अजून 499 रुग्णांच्या बायोप्सी तपासणीचा अहवाल मिळणे बाकी असल्याची माहिती आरोग्य विभागातील एका वरिष्ट अधिकार्‍याने दिली. 

नागपूर विभागात सर्वाधिक रुग्ण

या तपासणी अभियानात सर्वाधिक  129 रुग्ण नागपूर विभागात आढळले आहेत. येथे दीड लाख रुग्णांना संदर्भित करण्यात आले असता त्यापैकी 301 रुग्णांची बायोप्सी तपासणी केली असता त्यापैकी 129 रुग्णांना कर्करोग झाल्याचे समोर आले आहे. तर पुणे विभागात 53 रुग्ण आढळून आले आहेत.