Fri, Apr 26, 2019 19:48होमपेज › Pune › आठ महिन्यांत बांधकाम साईटवर ३७ कामगारांचा मृत्यू

आठ महिन्यांत बांधकाम साईटवर ३७ कामगारांचा मृत्यू

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 12:58AMपिंपरी ः प्रदीप लोखंडे 

यंदाच्या वर्षी पुणे जिल्ह्यात सुमारे विविध बांधकामांच्या ठिकाणी 37 बांधकाम कामगारांचे अपघात होऊन मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक साईटवर कामगार उपायुक्त कार्यालयाने भेट दिली नाही; तसेच मृत्यू पावलेल्या कामगारांच्या नातेवाइकांना उपायुक्त कार्यालयाकडून कामगारांना नुकसानभरपाई देखील मिळवून देण्यात आली नाही. कामगार उपायुक्तांनादेखील अपघाताच्या घटनेची माहिती दिली जात नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम ठेकेदारांवर कारवाई करणार कोण, असा प्रश्‍न बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने उपस्थित केला जात आहे. 

पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बांधकाम साईटवर बांधकाम कामगारांचा अपघात होऊन मृत्यू हेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगार सेनेच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयाकडे अपघाताच्या घटनांची माहिती मिळवली. त्यानुसार पुणे जिल्ह्यामध्ये 37 बांधकाम साईटवर कामगार अपघाताच्या घटना घडल्या असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक ठिकाणी एक किंवा दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. बांधकाम करताना ठेकेदाराकडून सुरक्षा साधनांचा पुरवठा न केल्यामुळे या घटना घडल्या आहेत. यामधील अनेक बांधकाम ठेकेदारांवर कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. अपघात झाल्यानंतर संबंधित साईटवर जाऊन पाहणी करणे बंधनकारक आहे; मात्र अधिकार्‍यांकडून याची टाळाटाळ होत आहे. कामगार उपायुक्तांनादेखील माहिती दिली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगार शासनाच्या योजनांपासून वंचितच राहत आहेत. कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असणारे बांधकाम ठेकेदारही राजरोसपणे फिरत असून त्यांच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कामगारांना न्याय देणार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

कामगारांची नोंदणी करण्याबाबत ठेकेदार व अधिकार्‍यांमध्ये उदासिनता दिसत आहे. नोंदित लाभार्थी कामगारांस 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य दिले जाते. या बरोबरच नोंदीत बांधकाम कामगारांचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. साईटवर कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास दहा हजार रक्कम अंत्यविधीसाठी दिली जाते. नोंदित लाभार्थी कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगारांच्या विधुर पतीस प्रतिवर्षी चोवीस हजार आर्थिक सहाय्य (पाच वर्षांपर्यंत) दिले जाते. नोंदित लाभार्थी बांधकाम कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास पाच लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य मिळत आहे; मात्र बांधकाम ठेकेदार कोणतीच माहिती देत नसल्याने कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. या बाबत कामगार उपायुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.