होमपेज › Pune › डीएसके दाम्पत्यावर 37 हजार पानांचे आरोपपत्र

डीएसके दाम्पत्यावर 37 हजार पानांचे आरोपपत्र

Published On: May 18 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी 

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी उर्फ डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात गुरुवारी दोषारोपपत्र दाखल केले. कुलकर्णी दाम्पत्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले दोषारोपपत्र तब्बल 36 हजार 875 पानांचे असून  कुलकर्णी यांनी दोन हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. 

कुलकर्णी यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होते. त्यासाठी तज्ज्ञ सनदी लेखापालांची मदत घेण्यात आली होती. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी केलेल्या व्यवहारांची माहिती नमूद केली आहे. कुलकर्णी यांची बँक खाती, कंपन्या, ठेवीदारांकडून गोळा केलेला पैशांचा अपहार कशा पद्धतीने केला याबाबतची कागदपत्रे दोषारोपपत्र जोडण्यात आली आहेत. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त नीलेश मोरे आणि त्यांच्या पथकाने दोषारोपपत्र तयार केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दोषारोपपत्र तयार करण्याचे काम वेगाने सुरू होते.  

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती सध्या येरवडा कारागृहात आहेत. त्यांनी विशेष न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. डीसकेंनी विविध 9 कंपन्यांच्या माध्यमातून नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचे आरोपत्रात नमूद केले आहे. यामध्ये तब्बल 33 हजार ठेवीदारांची फसवणूक झाली असून 6 हजार 792 नागरिकांच्या लेखी तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्‍त झाल्या आहेत. ड्रीमसिटीसाठी 477 कोटी 76 लाख रूपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यापैकी केवळ 150 ते 175 कोटी खर्च झाल्याचे तपास अधिकारी मोरे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. तसेच या घोटाळ्याला 2010 पासून सुरूवात झाल्याचे ते म्हणाले. ज्या कारणासाठी कर्ज घेतले गेले त्याच्यासाठी पैशाचा वापर  झाला नसल्याचे तपासात समोर आले आहे. हा पैसा साडी खरेदी, चपला खरेदी, केटरींगसाठी अशा विविध गोष्टींसाठी खर्ची केल्याचेही मोरे यांनी सांगितले.

हेमंती कुलकर्णी यांच्या बँक खात्यावरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाला आहे. आत्‍तापर्यंत झालेल्या तपासात डीएसके उद्योग समुहाकडून ठेवी व कर्ज स्वरूपातील 1 हजार 83.7 कोटी, वित्‍तीय संस्था आणि बँक यांच्याकडून 711.36 कोटी रूपये, कर्जरोख्याद्वारे 111.35 आणि फुरसुंगी येथील जमिनीच्या व्यवहारातून झालेल्या अपहाराद्वारे 136.77 कोटी असा एकूण 2 हजार 43 कोटी 18 लाखांचा घोटाळा झाला आहे. याप्रकरणी पहिले आरोपत्र दाखल झाले असून यामध्ये आणखी सहा आरोपींना अटक होणे बाकी आहे. त्यानुसार यामध्ये पुरवणी आरोपपत्र देखील दाखल होणार असल्याचे विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी यावेळी सांगितले. तसेच भादवि कलम 420,406,467,468,471, 411, 34, 120 (ब), महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये हे आरोपत्र दाखल करण्यात आले आहे.

दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी चार वाहने

फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने दोषारोपपत्रात डी. एस. कुलकर्णी यांनी केलेल्या प्रत्येक व्यवहारांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दोषारोपपत्र 36 हजार 875 पानांचे झाले आहे. गुरुवारी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांची चार वाहने न्यायालयात आली होती. दोषारोपपत्र मोठे असल्याने वेगवेगळी वाहने वापरण्यात आली.