होमपेज › Pune › ‘पंतप्रधान आवास’चे ३६ हजार अर्ज पूर्ण भरलेले 

‘पंतप्रधान आवास’चे ३६ हजार अर्ज पूर्ण भरलेले 

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 12:47AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या गृहप्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) केंद्र व राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. या योजनेतील एकूण अर्जांपैकी 36 हजार पूर्ण भरलेले आहेत. त्याचे वर्गवारीनुसार यादी केली जात आहे. उर्वरित अर्जांची छाननी सुरू असून, पात्र अर्जदारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली जाणार आहे. 

महापालिकेच्या ‘डीपीआर’ला राज्य शासनाने 10 नोव्हेंबरला आणि केंद्र शासनाने 29 नोव्हेंबरला मंजुरी दिली. त्यामुळे शहरात पंतप्रधान आवास योजनेचे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चर्‍होली, रावेत आणि मोशीतील बोर्‍हाडेवाडीत एकूण 3 हजार 664 घरे बांधण्यात येणार आहेत. चर्‍होलीत 1 हजार 442,  रावेतमध्ये 934 आणि बोर्‍हाडेवाडीमध्ये 1 हजार 288 घरे बांधली जाणार आहेत. 

या योजनेत शहराच्या वेगवेगळ्या भागांत 10 ठिकाणी एकूण 9 हजार 458 सदनिका बांधल्या जाणार आहेत. उर्वरित डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, वडमुखवाडीत 1 हजार 400, चिखलीमध्ये 1 हजार 400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीमध्ये 500 घरे उभारणीच्या ‘डीपीआर’ला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.   

या योजनेसाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज स्वीकारले होते. त्यात सुमारे 70 हजार अर्ज दाखल झाले, तर ऑनलाईनद्वारे सुमारे 35 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. नागरिकांकडून प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 36 हजार अर्जांसोबत सर्व कागदपत्रे आहेत. आणखी 18 हजार अर्जांची तपासणी सुरू आहे. या अर्जाची गटानुसार वर्गवारी केली जात आहे. त्यातील सर्वाधिक अर्ज अल्प उत्पन्न गटातील परवडणारी घरे या गटातील आहेत; तसेच झोपडपट्टीतील अर्जदार झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडे आणि कर्जाबाबतचे अर्ज बँकांकडे पाठविले जाणार आहेत. अर्जांपैकी एका कुटुंबांतील अनेक सदस्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील एक अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

पात्र अर्जदारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर वर्गवारीनुसार ‘अपलोड’ केले जाणार आहेत. जसजसे एका ठिकाणच्या प्रकल्पाचे बांधकाम काम सुरू होईल, तसे पात्र अर्जदारांकडून संबंधित ठिकाणास पसंती विचारात घेतली जाईल. त्यानुसार त्या-त्या प्रकल्पातील अर्जदारांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन 

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या पहिल्या टप्प्यातील 3 हजार 664 घरांची ही राज्यातील पहिलीच मोठी योजना आहे. त्या अंतर्गत चर्‍होली, रावेत आणि बोर्‍हाडेवस्ती येथे इमारती उभारले जाणार आहे. या कामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले जाणार आहे. बांधकामासोबत प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू राहणार आहे, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सोमवारी (दि.4) सांगितले.