Fri, Apr 26, 2019 09:49होमपेज › Pune › राज्यात रेबीजने ३६ जणांचा मृत्यू

राज्यात रेबीजने ३६ जणांचा मृत्यू

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 29 2018 12:42AMपुणे : प्रतिनिधी

रेबीजचा संसर्ग झालेले कुत्रे किंवा इतर प्राण्यांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन यावर्षी आतापर्यंत राज्यात 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक 12 जणांचे मृत्यू हे रायगड जिल्ह्यात झाले असून त्याखालोखाल औरंगाबाद आणि पुण्याचा क्रमांक लागतो. या दोन्ही शहरांमध्ये अनुक्रमे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

रेबीज हा विषाणुजन्य प्राणघातक रोग आहे. त्याची बाधा झालेल्या प्राण्यांच्या चाव्यातून विषाणू लाळेद्वारे जखमेत शिरतात. ते अतिसूक्ष्म व बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे असतात आणि तेथून मज्जातंतूवाटे मेंदूत प्रवेश करतात व तेथे त्यांची वाढ होते. तथापि 90 टक्के रेबीज हा माणसाला कुत्र्यापासून होतो. तसेच बाधित मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्‍कर, उंट, घोडा या पाळीव प्राण्यांबरोबरच कोल्हा, लांडगा, तरस, मुंगूस या जंगली प्राण्यांपासूनही होऊ शकतो. 

बाधित कुत्रा चावल्यानंतर लस न घेतल्यास 2 आठवडे ते सहा महिन्यांत या रोगाची लक्षणे दिसून येतात. परंतु चावा मेंदूपासून किती अंतरावर घेतलेला आहे त्यावर त्याची लक्षणे दिसून येण्याचा कालावधी अवलंबून असतो. पण चेहरा, मान, खांदा येथे चावा घेतल्यास एकाच आठवड्यात त्याची लक्षणे दिसून येऊ शकतात. तर हात, बोटे, पाय येथे असेल तर लक्षणे उशिरा दिसून येतात. बाधित प्राण्यांनी चावा घेतल्यास यामध्ये केवळ रेबीजप्रतिबंधक लस घेणे हाच एकमात्र उपाय असून लस न घेतल्यास मात्र 100 टक्के मृत्यू होतो. कारण त्यावर कोणतेही औषध सध्या उपलब्ध नसल्याचे डॉक्टर सांगतात.

राज्याच्या साथरोग विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पुण्यात यावर्षी जानेवारीपासून जूनपर्यंत पाच जणांचा मृत्यू महापालिकेच्या नायडू रुग्णालयात झाला आहे. यातील काही रुग्ण हे इतर जिल्ह्यातून पुण्यात उपचारासाठी आलेले होते.  त्याचबरोबर अकोला - 1, औरंगाबाद -6, कोल्हापूर - 4, मिरज -5,  गडचिरोली - 1, सोलापूर - 2, पुणे- 5 आणि रायगडमध्ये सर्वाधिक 12 अशा 36 रुग्णांचा मृत्यू संपूर्ण राज्यात झाला.

बाधित कुत्र्याने चावा घेतल्यास त्यावर तत्काळ ‘अँटी रेबीज व्हॅक्सिन’ची लस घेणे आवशक आहे. तसेच ज्या व्यक्‍ती सतत कुत्र्यांच्या, प्राण्यांच्या संपर्कात असतात त्यांनी आधीच ही लस घेणे आवश्यक आहे. तसेच कुत्र्यांनाही पशुसंवर्धन विभागातील अधिकार्‍यांकडून लस देणे आवश्यक आहे. याबाबत जागृती होण्यासाठी सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रेबीजबाबत काय काळजी घ्यावी याबाबत भित्तीपत्रांद्वारे जागृती केली जात आहे.   -डॉ. जितेंद्र डोलारे, राज्य साथरोग अधिकारी