Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Pune › उसने घालण्यासाठी दिलेले ३५ लाखांचे दागिने लंपास

उसने घालण्यासाठी दिलेले ३५ लाखांचे दागिने लंपास

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 05 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी 

गणपती उत्सव आणि नवरात्री उत्सवामध्ये मिरविण्यासाठी जीम मालकाकडून 35 लाखांचे दागिने वापरण्यासाठी घेऊन साथीदाराच्या मदतीने दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आणखी एका महिलेला अटक केली. तिला न्यायालयाने 6 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

अर्चना मिलिंद कांबळे (43, रा. सुंदरनगरी, सोमवारपेठ) असे पोलिस कोठडी झालेल्या महिलेचे नाव आहे. यापूर्वी गुन्ह्यातील मुख्य संशयित सारिका संग्राम लाहिगुडे उर्फ पन्हाळकर (34, रा. कसब पेठ सध्या रा. अशोका हेरिटेज, पिंपळे निलख) आणि गगनकुमार प्रीतमदास महोत्रा (29, रा. विश्रांतवाडी, पिंपळे निलख) यांना याप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आली होती. रूक्मिणी सुभाष पन्हाळकर (कसबापेठ) हिचा देखील पोलिस शोध घेत आहे. याबाबत शकील शकुर बिजापुरे (44, स्कायबेलवेडर, विमाननगर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 24 ऑगस्ट 2017 ते नोव्हेंबर 2017 दरम्यान वडगावशेरी येथील सनसिटी येथे घडला. बिजापुरे यांचा वडगावशेरी परिसरात तसेच अन्य ठिकाणी जीमचा व्यवसाय आहे. तेथे सारिका लाहिगुडे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होती. 

ऑगस्ट 2017 मध्ये सारिकाला गणपती तसेच नवरात्रीच्या उत्सवामध्ये दागिने घालून मिरवायचे असल्याने तिने बिजापुरे यांना त्यांच्याकडील सोन्याची मागणी केली होती. त्यानुसार बिजापुरे यांनी घरातील तब्बल 35 लाखांचे दागिने तिला वापरण्यासाठी दिले होते. हे दागिने तिने परत करण्याच्या अटीवर घेतले होते. परंतु तिच्याकडे वारंवार मागणी करूनही तिने ते परत केले नाही. याप्रकरणी गुन्ह्याच्या अनुषंगाने सारिकाची बहीण अर्चना कांबळे हिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. दागिने जप्‍त करायचे आहेत, गुन्ह्यातील आरोपी पोलिस तपासामध्ये सहकार्य करीत नाहीत, सारिका हिच्या नातेवाईकांचा कोल्हापूर येथे सोने खरेदी विक्रीचा व्यावसाय आहे. या अनुषंगानेही तपास करायचा आहे.