Thu, May 28, 2020 10:54होमपेज › Pune › जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ३३५ कोटींची कर्जमाफी

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ३३५ कोटींची कर्जमाफी

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 1:00AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 4 हजार 274  शेतकरी कर्जमाफीच्या योजनेत पात्र ठरलेले आहेत.त्यांच्या बँक खात्यावर बुधवारअखेर 334 कोटी 68 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सूत्रांकडून देण्यात आली. त्यामध्ये थकीत कर्जदारांची कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभाचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले.

कर्जमाफी योजनेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2 लाख 20 हजार 386 शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी माहिती तंत्रज्ञान विभागाकडून बँकेला संबंधित शेतकर्‍यांची हिरवी यादी कळविण्यात आली. त्यानंतर ऑनलाइन अर्जांमध्ये असलेल्या अटींची पूर्तता नियमाप्रमाणे झाल्याची खात्री बँकेच्या शाखांकडून करण्यात आली. हिरव्या यादीच्या नावात काही चुकांंचे निरसन करून त्या अद्ययावत करण्यात आल्यानंतर कर्जमाफीचा लाभ संबंधित शेतकर्‍यांच्या कर्ज आणि बचत खात्यावर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  

शासनाकडून जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांच्या हिरव्या यादीनुसार 641 कोटी 55 लाख 69 हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्यापैकी 410 कोटी 59 लाख रुपये पीडीसीसी बँकेला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यापैकी 334.68 कोटींची कर्जमाफी देण्यात आलेली आहे. उर्वरित देय रकमेमध्ये कर्जमाफीच्या प्राप्त हिरव्या यादीमधील शेतकर्‍यांच्या ऑनलाइन अर्जांची तपासणी सुरू आहे. 
त्यामध्ये सोसायटीचे नाव, शाखा, आयएफएससी कोड नंबर, ब्रँच आयडी नंबर, आधार क्रमांक आणि कर्जाची रक्‍कम याबाबत तपासणी करून त्या दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. येत्या आठवडाभरापर्यंत या अर्जांची पडताळणी पूर्ण होईल.