Fri, Jul 19, 2019 05:44होमपेज › Pune › अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड 2018 ते 2023 पर्यंतची कार्यकारिणी

कबड्डी संघटनेत ३३ टक्के महिला

Published On: May 27 2018 1:21AM | Last Updated: May 27 2018 12:15AMपुणे : प्रतिनिधी

पुणे जिल्हा कबड्डी संघटनेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी कार्यकारिणीमध्ये यापुढेही महिलांना प्राधान्य देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली होती. त्याप्रमाणे संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये तब्बल 33 टक्के आरक्षण देण्यात आले असून संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या अध्यक्षपदामुळे अजित पवार यांचा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची नवी कार्यकारिणी ही 2018 ते 2023 पर्यंत असून संघटनेच्या महिला उपाध्यक्षपदी शकुंतला खटावकर यांची निवड करण्यात आली असून एक पद रिक्‍त ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्‍त उपाध्यक्षपदी विरधलवल जगदाळे, अतुल बेनके आणि महादेव कोंढरे यांची निवड करण्यात आली आहे. नियामक मंडळाच्या आजीव सदस्यपदी दौलत ढमाले आणि लक्ष्मण मद्रासी यांची तर महिला राष्ट्रीय खेळाडू शीतल मारणे हिची आणि पुरुषांमध्ये आत्माराम कदम यांची निवड करण्यात आली आहे. संस्थांच्या सभासदांमधून सुनिल चांदेरे यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारी मंडळामध्ये शहर विभागातून वासंत बोर्डे, शिल्पा भोसले आणि मोहिनी जोग यांची महिला राष्ट्रीय खेळाडूंमधून निवड करण्यात आली आहे. खुल्या वर्गाच्या पुरुषांमधून आत्माराम घेगडे, विलास नाईक, योगीराज टकले, योगेश यादव, राजेंद्र देशमुख, भाऊसाहेब करपे, ऋषिकेश मद्रासी, भरत शिळीमकर, रविंद्र आंदेकर, संदीप पायगुडे, महेंद्र धनकुडे, बलराज घाडेकर, दत्तात्रय कळमकर, प्रकाश बालवडकर यांची तर शहर विभागातून सुजाता समगीर यांची निवड करण्यात आली आहे. 

पिंपरी चिंचवड विभागातून सहा जणांपैकी नीलेश लोखंडे, दत्तात्रय झिंजुर्डे आणि संजोग वाघेरे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणमधून सूर्यकांत मुटके, प्रशांत सातव, प्रकाश पवार, अनिल यादव आणि राजेंद्र पायगुडे यांची, तर रंजना पोतेकर यांची महिला कबड्डी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्‍त मधुकर नलावडे यांना आजीव सदस्य म्हणून संघटनेवर घेण्यात आले असून काही पदे रिक्‍त ठेवण्यात आलेली आहेत. 

बाबूराव चांदेरे रायगड संघटनेतून

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीपूर्वीच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आजी-माजी खेळाडूंनी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष बाबूराव चांदेरे यांना विरोध दर्शविला होता. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांच्याकडे रायगड विभागाच्या संघटनेचे काम दिले असून संघटनेतील फूट रोखल्याची चर्चा खेळाडूंमध्ये सुरू आहे.