पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरीतील वल्लभनगर एसटी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणार्या बॉम्बचा स्फोट झाल्याने दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला. यामुळे श्वानपथक आणि बॉम्ब शोधक व निकामी पथकाने परिसरात तपासणी करुन तब्बल 33 अशा प्रकारचे बॉम्ब नष्ट केले.
वल्लभनगर येथील बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पलीकडे एक मोठी गटार आहे. या गटारावर डुक्कर फिरत असतात. ही डुक्करे मारण्यासाठी जिलेटीन आणि मांसाचा तुकडा असा असणारा बॉम्ब तयार केला जातो. मासांचा तुकडा वरती लावला जात असल्याने दिसता क्षणीच डुक्कर ते खाण्याचा प्रयत्न करतात. एकदा तो बॉम्ब चघळला की त्याचा स्फोट होतो आणि डुक्कर मरते. यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो.
रविवारी सायंकाळी अशाच प्रकारचे दोन स्फोट वल्लभनगर परिसरात झाले. मोठा आवाज झाल्याने एसटी स्थानकाच्या आवारातील प्रवासी आणि कर्मचार्यांमध्ये घबराट पसरली. एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. तेथे वावरणार्या दोन भटक्या कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिस तसेच अग्निशमन दलाला मिळाली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलिस घटनास्थी पोहचले. पुणे पोलिसांच्या बाँबशोधक व नाशक पथक (बीडीडीएस), श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी याच परिसरात पडलेली आणखी 33 बॉम्ब सापडले. हे बॉम्ब बीडीडीएस पथकाने निकामी केले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पोलिस तपास घेत आहेत.