Thu, Jul 18, 2019 00:05होमपेज › Pune › पुणे मॅरेथॉनला ३२ लाखांचा निधी

पुणे मॅरेथॉनला ३२ लाखांचा निधी

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी

महापौरांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत महापालिका प्रशासनाने  पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी तब्बल 32 लाख 22 हजार रुपयांचा निधी परस्पर दिला असल्याचे आता उघडकिस आले आहे, विशेष म्हणजे पालिकेच्या क्रिडा विभागाने हा निधी देण्यासाठी नकारात्मक अभिप्राय दिला होता.  त्याकडे दुर्लक्ष करून तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी हा निधी देण्याचे आदेश दिले असल्याचे समोर आले आहे.

शहरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतुद केली जाते व त्यानुसार स्पर्धेच्या बक्षिसांची रक्कम महापालिकेकडून दिली जाते. मात्र, गतवर्षी 3 डिसेंबरला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, स्पर्धा पार पडण्याआधीच भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने या  मॅरेथॉन स्पर्धेची मान्यता नाकारली असल्याचे समोर आले होते.

मात्र, या स्पर्धेला असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन (एम्स) या संघटनेची परवानगी असल्याने भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या मंजुरीची गरज नसल्याचा दावा पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजकांकडून करण्यात आला होता. मात्र कोणतीही स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी ‘एम्स’ देत नसल्याचे एम्सकडूनच स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे ही स्पर्धा अडचणीत आली होती. त्यावर या स्पर्धेच्या स्वागत समितीमध्ये असलेल्या महापौर मुक्ता टिळक यांनी सावध पवित्रा घेतला होता, तसेच या स्पर्धेच्या कार्यक्रमाला दांडीही  मारली होती. तसेच भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाची मान्यता नसल्याने या स्पर्धेसाठी निधी देण्यात येऊ नये असे आदेशही त्यांनी दिले होते. 

विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्त कुमार यांनीही या स्पर्धेसाठी निधी देता येणार नसल्याचे त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर या स्पर्धेला निधी देण्याबाबत क्रिडा विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला होता. त्यावर क्रिडा विभागाने या निधीसाठी पालिकेच्या क्रिडा धोरणात कोणतीही तरतुद नसल्याने निधी देता येणार नसल्याचे स्पष्ट अभिप्राय दिला होता. 
मात्र, या सर्वांना केराची टोपली दाखवत  तत्कालीन आयुक्त कुमार यांनी स्पर्धेच्या आयोजकांना 32 लाख 22 हजार रुपये देण्याचे आदेश दिले. त्यानुसार  आयोजकांना निधी दिला गेला असल्याची माहितीला पालिकेच्या लेखा परिक्षण विभागाकडून देण्यात आली.