Wed, Jul 17, 2019 10:59होमपेज › Pune › पुणे जिल्ह्यातील ३१ ब्रिटिशकालीन पूल सक्षम

पुणे जिल्ह्यातील ३१ ब्रिटिशकालीन पूल सक्षम

Published On: Feb 02 2018 1:43AM | Last Updated: Feb 02 2018 1:05AMपुणे ः समीर सय्यद

कोकणातील सावित्री पुलावरील दुर्घटनेनंतर राज्यातील ब्रिटिशकालीन पुलांचे सर्वेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले. त्यात जिल्ह्यात विविध नद्यांवर असलेल्या 31 ब्रिटिशकालीन पुलांचा समावेश होता. या सर्वेक्षणातून हे सर्व पूल वाहतुकीसाठी सक्षम असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यातील बहुतांश ब्रिटिशकालीन पूल नादुरुस्त अवस्थेत असून, त्यांची जुजबी डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोल्हापुरात पंचगंगेवर झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा कोकणातील सावित्री नदीवरील दुर्घटनेची कडू आठवण झाली. या अपघाताच्या निमित्ताने ब्रिटिशकालीन पुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुणे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाच विभाग असून त्यात सार्वजनिक बांधकाम पूर्व, दक्षिण, उत्तर, प्रकल्प आणि सा.बां. विभाग पुणे असे आहेत. या विभागांच्या अखत्यारित 31 ब्रिटिशकालीन पूल येतात. सावित्री दुर्घटनेनंतर हे सर्व पूल वाहतुकीसाठी योग्य आहेत की नाही, याचे सर्वेक्षण करण्यात आले. आवश्यक असलेल्या ठिकाणी किरकोळ दुरुस्त्या करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व विभागात बारामती, इंदापूर, दौंड आणि शिरूर तालुक्यांचा समावेश असून 22 ब्रिटिशकालीन पूल आहेत. दक्षिण विभागात भोर, वेल्हे, मुळशी आणि हवेली तालुके असून 5 पूल आहेत. उत्तर विभागामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यांचा समावेश असून केवळ 1 पूल, तर प्रकल्प विभागात 3 पूल आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश पुलांनी वयाची शंभरी ओलांडली असतानाही हे पूल वाहतुकीसाठी योग्य असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र, वास्तवात अनेक पुलांना नवसंजीवनी देण्याची गरज आहे.

‘त्या’ 14 पुलांचे काय?

सावित्री दुर्घटनेनंतर केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत देशातील 100 पूल धोकादायक असल्याची माहिती दिली होती. त्यात राज्यातील 14 पुलांचा समावेश होता. या यादीत सांगली जिल्ह्यातील 4, सोलापूरमधील 3, पुणे आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी 2 तसेच औरंगाबाद, कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रत्येकी एका पुलाचा समावेश होता.

स्ट्रक्चरल ऑडिट कसे करतात?

इमारत किंवा पुलांचा कमकुवतपणा प्रयत्न करून शोधावा लागतो. त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ मूळ संकल्पनेत गृहीत धरलेला भार व तुलनेत आज प्रत्यक्षरीत्या येणारा भार, आजचा वापर, पुलाच्या बांधकामात केलेले बदल, बांधकामासाठी वापरलेल्या घटक पदार्थांची गुणवत्ता, आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती इत्यादी. या सर्व माहितीचे तांत्रिक विश्‍लेषण करून बांधकामाची सद्यःस्थितीतील ताकद आजमावता येते.