Tue, Jul 23, 2019 17:20होमपेज › Pune › जुन्नरमध्येही ३० किलो गांजा जप्त; एक ताब्यात

जुन्नरमध्येही ३० किलो गांजा जप्त; एक ताब्यात

Published On: Dec 30 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 12:02AM

बुकमार्क करा
जुन्नर : वार्ताहर

शहरातील भर वस्तीतील जुन्नर नगरपरिषदेचा सध्या बंद असलेल्या रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये चारचाकीमधून तयार गांजा विक्रीकरिता आणलेला असताना जुन्नर पोलिसांनी ताब्यात घेतला. हा गांजा सुमारे 30 किलो आहे. शुक्रवारी (दि. 29) सकाळी ही कारवाई करण्यात आली.

सूरज जयसिंग परदेशी (वय 32, रा. भाई कोतवाल चौक, जुन्नर) याला या प्रकरणी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. जुन्नर पोलिस ठाण्यात या घटनेची फिर्याद नोंद करण्यात आली. भाई कोतवाल चौकालगत जुन्नर नगरपरिषदेचे जुने रुग्णालय आहे. हे रुग्णालय सध्या बंद अवस्थेत आहे. त्याच्या प्रांगणामध्ये उभी असलेली इंडिका (एमएच 14 बीए 7999) या चारचाकी गाडीची जुन्नरचे पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नारायण खंडागळे, गणेश जोरी यांनी तपासणी केली असता यामध्ये सुमारे 30 किलो तयार गांजा मिळून आला.

याप्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान शहराच्या भर वस्तीच्या भागात तसेच शासकीय इमारतीच्या प्रांगणात विक्रीकरिता आणलेला गांजा पोलिसांनी रंगेहात पकडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.