होमपेज › Pune › एसटीचा ३० टक्के  भाडेवाढीचा प्रस्ताव

एसटीचा ३० टक्के  भाडेवाढीचा प्रस्ताव

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: Jun 01 2018 1:21AMपुणे ः प्रतिनिधी

इंधनाचे वाढते दर आणि कर्मचार्‍यांच्या वेतन वाढीमुळे एस.टी. महामंडळावर येणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी महामंडळाच्या वतीने एस.टी.च्या भाड्यात तब्बल 30 टक्के वाढीचा प्रस्ताव अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे. वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती, तसेच महामार्गावरील टोलच्या दरात झालेल्या वाढीची तफावत दूर करण्यासाठी हा दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

एस.टी. प्रशासनाने आपोआप भाडेवाढीच्या सूत्रानुसार इंधन दरात झालेली वाढ, भविष्यात कर्मचार्‍यांच्या वेतनकराराच्या अनुषंगाने येणारा आर्थिक बोजा, वाहनांच्या सुट्या भागाचे वाढलेले दर या घटकांचा विचार करून एस.टी.चे तिकीटदर 30 टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षांना सादर केला आहे. डिझेल दरवाढीमुळे सुमारे 470 कोटी रुपये अतिरिक्‍त रक्‍कम खर्च होणार असून, तेवढीच रक्‍कम कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसाठी तरतूद करणे अपेक्षित आहे.

वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती व टोल दरातील वाढीमुळे तब्बल 2,200 कोटी संचित तोटा सहन करणार्‍या एस. टी. महामंडळाला नाईलाजास्तव 30 टक्के भाडेवाढ करणे गरजेचे आहे. त्यानुसार भाडेवाढीचा प्रस्ताव एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षांकडे सादर केला आहे. त्याबाबत अंतिम निर्णय महामंडळाचे अध्यक्ष घेतील, असे एस. टी. प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.