Thu, Apr 25, 2019 05:34होमपेज › Pune › खडकवासलातून पीएमआरडीएला ३ टीएमसी पाणी

खडकवासलातून पीएमआरडीएला ३ टीएमसी पाणी

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:00AMपुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर विकास क्षेत्रच्या (पीएमआरडीए) हद्दीतील गावांना आवश्यक सोई-सुविधा पुरविण्याची जबाबदारी ‘पीएमआरडीए’ची आहे. त्यातूनच हद्दीतील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला साखळी धरणातून तीन ‘टीएमसी’ पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे, अशी माहिती ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी ‘पुण्याची सद्यस्थिती आणि विकासाची दिशा’ या विषयावर आयोजित वार्तालापमध्ये गित्ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमारही या वार्तालापात सहभागी झाले होते.

दिल्ली, बंगळूर, म्हैसूरनंतर ‘पीएमआरडीए’चे क्षेत्र मोठे आहे. या क्षेत्राचा विकास आराखडा सिंगापूरची कंपनी करणार असून, त्याविषयी बोलणी सुरू आहे. विकास आराखडा मंजूर करताना आर्थिक स्वावलंबन कसे आणायचे, याचाही विचार त्यात केला जाणार आहे. जमिनीचे वाढते भाव हे नगररचना न होण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत आठ नगररचना योजना (टीपी स्कीम) मार्गी लागणार आहेत. म्हाळुंगे-माण टीपी स्कीम अंतिम टप्प्यात आहे, असे गित्ते यांनी सांगितले. पीएमआरडीएच्या हद्दीतील 25 ते 30 गावांची लोकसंख्या ही नगरपालिकेपेक्षाही अधिक आहे. पुणे शहरात भेडसावणारा कचरा प्रश्‍न आता तिथेही निर्माण झाला आहे. त्यामुळे या गावांतील कचर्‍यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने प्रक्रिया केली जाणार आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.    
‘हापरलूप’संदर्भात हालचाली वेगात

‘हायपरलूप वन’ कंपनीच्या अधिकार्‍यांनी प्रस्तावित पुणे-मुंबई मार्गाची पाहणी केली आहे, त्यानुसार पुढील सहा महिन्यांत या संदर्भातील व्यवहार्यता अभ्यास अहवाल शासनास सादर केला जाणार आहे.  हा प्रकल्प राबविणे शक्य आहे की नाही अभ्यास केला जात आहे, असेही गित्ते यांनी या वेळी सांगितले.

शहराची काळजी करणारे नागरिक पुण्यात कोणत्याही शहरातील नागरिक जेव्हा सतर्क व जागरूक असतात, त्या शहराचा विकास झपाट्याने होतो. पुणे शहरामध्ये अशा नागरिकांची संख्या मोठी आहे. शहराची काळजी करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात असल्याने मोठे प्रकल्प आखण्याचे धाडस आम्ही केले. या प्रकल्पांची काळजी पुणेकर नक्कीच घेतील, असा विश्‍वास महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केला. 

ते म्हणाले, पालिका आयुक्त म्हणून पुण्यात आल्यानंतर शहरातील कामे करण्यासाठी मी 152 विषयांची यादी तयार केली होती. शहराला 11.5 टीएमसी पाणी देण्याचे शासनाचे धोरण असतानाही आज शहर 15 टीएमसी पाणी वापरते. पाणी वापराचे प्रमाण गळतीमुळे वाढले आहे. समान पाणीपुरवठा योजनेमध्ये शहरातील पाईपलाईन बदलून पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले जाणार आहे. त्यामुळे शहराला चोवीस तास पाणी देणे शक्य होणार आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याचा प्रयत्न पार्किंग धोरणाच्या माध्यमातून केला गेला आहे. जोगोजागी पार्किंगला पैसे मोजावे लागतात, म्हंटल्यावर नागरिक एका ठिकाणी गाडी पार्क करून चालत फिरतील, किंवा पार्किंगला पैसे द्यावे लागतात, म्हणून स्वतःची वाहने घरी ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतील, असेही कुणाल कुमार म्हणाले.

‘जलयुक्त’मध्ये 190 गावांचा समावेश

पुणे जिल्ह्याची सुमारे 1 कोटी 4 लाख लोकसंख्या असून, ‘पीएमआरडीए’ची स्थापना झाल्यानंतर प्रशासकीय सुसूत्रता आली आहे. विमानतळ, रिंग रोड, पाणी, महामार्ग, भूसंपादन, रस्ते आदी कामे सुरू आहेत. जिल्ह्यास टँकरमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक स्रोतांचा शाश्वत वापर करून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.

पुणे-सातारा, पुणे- नाशिक रस्त्याची कामे सुरू असून, वीस हजार कोटींची कामे मागील दोन वर्षात पूर्ण झाली आहेत. दोन्ही पालख्यांचे मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले असून, या महामार्गांचे रुंदीकरण करण्याचे काम केले जाणार असल्याचेही राव यांनी सांगितले.

विमानतळ बाधितांच्या मुलांना रोजगार देणार 

पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ प्रस्तावित आहे. यासाठी सुमारे तीन हजार हेक्टर जमिनीचे संपाादन करावे लागणार आहे. ते पूर्ण होण्यासाठी पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. जमीनमालकांना योग्य मोबदला आणि बाधित कुटुंबातील मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.

तिन्ही विभागांच्या समन्वयानेच विकासाला गती

पुणे शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा, पालिका आणि पीएमआरडीए प्रशासनाने एकत्रित येऊन समन्वयाने काम करणे गरजचे आहे, हे ओळखूनच आम्ही समन्वयाने विकासाला गती देण्याचे काम करीत आहोत. रिंगरोडचा विषय असो, मेट्रोचा विषय असो, पाण्याचा विषय असो, विमानतळाचा विषय असो यांसह इतर विषय हाताळताना आम्ही तिन्ही विभाग समन्वय साधतो. मेट्रो हा विषय महापालिकेचा असूनही, पालिका आणि पीएमआरडीए प्रशासन एकत्रितरीत्या त्या संबंधीचे नियोजन करीत आहे. या सर्व कामांमध्ये पालिका आणि पीएमआरडीएचा समन्वय आहे, असे जिल्हा प्रशासनातील तिन्ही प्रमुखांनी सांगितले. 

 

Tags : pune, pune news,  Khadakwasla,  Khadakwasla dam, water,