Wed, Jul 17, 2019 10:24होमपेज › Pune › खडकवासला साखळीत २८ टक्केपाणी

खडकवासला साखळीत २८ टक्केपाणी

Published On: May 06 2018 1:16AM | Last Updated: May 06 2018 1:10AMखडकवासला : वार्ताहर

पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या तसेच दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यातील पिकांसाठी महत्त्वपूर्ण असणार्‍या खडकवासला धरणसाखळीत अवघे 8.39 टीएमसी म्हणजे केवळ 28.79 टक्के पाणी शिल्लक आहे. शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी सोडण्यात येत असल्याने  पाणी साठ्यात वेगाने घट सुरू आहे. दुसरीकडे कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. टेमघरनंतर आता वरसगाव धरणही जवळपास कोरडे आहे. वरसगावमध्ये केवळ 0.17 टीएमसी इतके पाणी उरले आहे. त्यामुळे पाणी कपातीची चिंता वाढली आहे. धरणसाखळीत जवळपास गतवर्षीइतका पाणीसाठा आहे.  उन्हाची तीव्रता वाढली आहे. पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे चांगला पाऊस होईपर्यंत उपलब्ध पाणी साठयातून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे आवाहन आताच उभे राहिले आहे. 

31 जुलै अखेर पर्यंत पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणीसाठा धरणसाखळीत राखीव ठेवण्यात येणार आहे, असे खडकवासला जलसंपदा विभागातुन सांगण्यात येत आहे. असे असले तरी ऐन उन्हाळ्यात खडकवासला धरणसाखळीतून पिण्यासाठी व शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा आहे. हवेली, दौंड, इंदापुर आदी तालुक्यातील 66 हजार हेक्टर शेतीला उन्हाळी आवर्तनाचे पाणी दि. 24 मार्चपासून सोडले जात आहे. पुढील आठवड्यात उन्हाळी आवर्तनाचा पहिला टप्पा संपल्यानंतर पुन्हा एकदा पाणी सोडले जाणार आहे. खडकवासला धरण साखळीतील सर्वात मोठे वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरण जवळपास कोरडे पडले आहे. धरणात केवळ 0.17 टक्के इतका गाळ मिश्रीत पाणीसाठा आहे. वरसगावमधून 1212 क्युसेस वेगाने पाणी सोडले जात असल्याने खडकवासला धरण तुडुंब भरले आहे. वरसगावमधील पाणी संपल्यानंतर पानशेत धरणातील पाण्यावरच पुणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांची व शेतीची तहान भागवली जाणार आहे. वरसगाव कोरडे पडल्याने    मोसे नदीचे मुळ पात्र उघडे पडले आहे. विस्तार्ण पाणलोट क्षेत्रात गाळ मातीचे तांडे दिसत आहेत. टेमघर धरण गळतीच्या कामासाठी पाच महिन्यांपासून कोरडे केले आहे.

गत वर्षीच्या तुलनेत खडकवासला धरणसाखळीत जवळपास एक टीएमसी जादा पाणी आहे. असे असले तरी पिण्यासाठी तसेच शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने पाणी साठ्यात वेगाने घट सुरू आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 5 मे 2017 रोजी धरणसाखळीत  7.48 टीएमसी म्हणजे 25.67  टक्के इतके पाणी होते. सध्या 8.3 9 टीएमसी म्हणजे 28.79  टक्के इतके पाणी आहे. पुणेकरांसह परिसर व जिल्ह्यातील नागरिकांची तसेच हजारो हेक्टर शेतीची तहान भागविण्यासाठी  खडकवासलातून मुबलक प्रमाणात पाणी सोडले जात आहे. मुठा कालव्यात 1401 क्युसेस वेगाने पाणी सोडले जात आहे. या शिवाय धरणातून विविध पाणी पुरवठा योजनांना थेट पाणी दिले जात आहे. कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. त्यामुळे दर तासागणिक घट सुरू आहे. पाणीसाठयात वेगाने घट सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. मागणीप्रमाणे पाणी सोडले जात असल्याने पावसाळ्याच्या सुरूवातीलाच धरणसाखळीत पाणीसाठयाची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी कपातीची चिंता वाढली आहे.