Mon, Jun 24, 2019 21:26होमपेज › Pune › २६७ दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे

२६७ दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे

Published On: Jan 25 2018 1:18AM | Last Updated: Jan 25 2018 12:38AMपुणे ः प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत राबविलेल्या विशेष मोहिमेद्वारे अस्वच्छता, भेसळीच्या संशयावरून 26 हजार 520 रुपयांचे 615 लिटर दूध नष्ट केले आहे. त्याचबरोबर दूध उत्पादक ते वितरकांकडून 267 दुधाचे नमुने घेत तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवले असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्‍त शिवाजी देसाई यांनी दिली. दरम्यान, तपासणीसाठी दिलेल्या दुधाच्या नमुन्यांचा महिनाभरात अहवाल प्राप्त होईल. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

एफडीएने दि. 16 ते 23 जानेवारीदरम्यान पाच जिल्ह्यांत विशेष मोहीम राबविली होती. त्यामध्ये 43 किरकोळ दूध विक्रेते, 10 दूध वितरक, 54 दूध संकलन व शीतकरण केंद्रे, 36 दूध उत्पादक  व प्रक्रिया केंद्रे (डेअरी) तसेच जकात नाका येथून 159 नमुने गोळा करण्यात आले आहेत. ते नमुने जिल्हा प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठविले असून यामध्ये भेसळ अथवा अप्रमाणित नमुने आढळल्यास त्यांच्यावर अन्नसुरक्षा मानके कायद्यांतर्गत दंड, न्यायालयात खटले दाखल करणे अशी कारवाई करण्यात येणार आहे.

ही मोहीम अन्न प्रशासन विभागाच्या आयुक्‍त पल्‍लवी दराडे यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व ठिकाणी राबविण्यात आली आहे. या मोहिमेत काही ठिकाणी दुग्धविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा यांची मदत घेण्यात आली आहे. तर पुण्यातील कारवाई अन्‍न प्रशासन सहआयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.