Thu, Nov 15, 2018 12:21



होमपेज › Pune › मराठा आरक्षण जनसुनावणीत 26 हजार निवेदनांचा पाऊस

मराठा आरक्षण जनसुनावणीत 26 हजार निवेदनांचा पाऊस

Published On: Jun 30 2018 1:44AM | Last Updated: Jun 30 2018 1:25AM



पुणे : प्रतिनिधी

मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात शुक्रवारी पुण्यातील विधानभवन येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने जनसुनावणी घेतली. या जनसुनावणीमध्ये सुमारे 26 हजार निवेदने समितीपुढे सादर करण्यात आली. यामध्ये सामाजिक संघटना, ग्रामपंचायतीचे ठराव, वैयक्‍तिक निवेदनांचा समावेश आहे, अशी माहिती राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांनी दिली.

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 29) विधानभवनातील सभागृहामध्ये जनसुनावणी झाली. या वेळी समितीचे सदस्य सर्जेराव निमसे, दत्तात्रय बाळसराफ, चंद्रशेखर देशपांडे, प्रमोद येवले, रोहिदास जाधव, सुधीर ठाकरे, सुवर्णा रावळ, भूषण कर्डिले; तसेच सदस्य सचिव डी. डी. देशमुख, आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, जनसुनावणीत मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात व्यक्ती व संघटनांकडून निवेदने स्वीकारून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.

पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातील व्यक्ती, संस्था व संघटना यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणासंबंधी निवेदने सादर केली. या निवेदनासोबतच लेखी पुरावा व ऐतिहासिक दस्तऐवज आणि त्यांचे वैयक्‍तिक अनुभव अशा प्रकारच्या माहितीचा त्यात समावेश होता. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, ते देण्यात यावे, अशी मागणी करणारे ठराव सादर केले आहेत. यामध्ये दौंड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

प्राप्त 26 हजार निवेदनांपैकी काही निवेदने ओबीसी आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशा मागणीची होती. राज्यभरातून प्राप्त झालेल्या निवेदनांची संख्या मोठी असून, त्यावर आयोग अभ्यास करून मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा अहवाल शासनाला सादर करणार आहे. पुणे येथे झालेली ही बैठक राज्यातील शेवटची होती. यानंतर ज्यांना आपले म्हणणेे मांडायचे आहे, त्यांनी मुंबई अथवा पुण्यातील कार्यालयात निवेदन सादर करावेत, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.