Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › 26  हजार 593 विद्यार्थी अभियोग्यता चाचणीपासून दूरच

26  हजार 593 विद्यार्थी अभियोग्यता चाचणीपासून दूरच

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 22 2017 12:57AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी शासनाने अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणी घेतली आहे. दि.12 ते 21 डिसेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी तब्बल 1 लाख 97 हजार 520 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 लाख 70 हजार 927 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. परंतु पसंतीचे केंद्र न मिळाल्यामुळे तसेच अन्य कारणामुळे तब्बल 26 हजार 593 विद्यार्थी या परीक्षेपासून दूरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची टक्केवारी 86.54 टक्के असल्याचे दिसून आले आहे.

2012 मध्ये बंद झालेल्या शिक्षक भरतीनंतरही अनेक शाळांनी वैयक्तिक मान्यतांच्या आणि ना-हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केली. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमियतता देखील झाली. त्यामुळेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राज्यातील 67 केंद्रावर अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणी घेण्यात आली. या परीक्षेत विद्यार्थ्यांना तांत्रिक गोंधळाला सामोरे जावे लागले आहे. तर, चाचणीत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची काठीण्यपातळी जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळच अपुरा पडला आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या चाचणी परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकांवर आधारित उत्तरसूची विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले.