Thu, Apr 25, 2019 06:14



होमपेज › Pune › बोपखेल पुलाच्या जागेसाठी लष्काराला 26 कोटी देणार

बोपखेल पुलाच्या जागेसाठी लष्काराला 26 कोटी देणार

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:02AM



पिंपरी : प्रतिनिधी

बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर उड्डाणपूल बांधण्यासाठी खडकीच्या 512 आर्मी बेस वर्कशॉप येथील जागेच्या मोबदल्यात 25 कोटी  81 लाख 51 हजार  200 रुपये निधी देण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि. 9) मान्यता दिली. त्यामुळे पूल उभारणीचा प्रश्‍न अखेर मार्गी लागणार आहे. याप्रकरणी पालिका प्रशासन जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप सदस्यांनी पुराव्यासह केला. त्यामुळे प्रशासनाची आडमुठेपणा उघड झाला.

या प्रकरणी ‘पुढारी’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून बोपखेलच्या नागरिकांचा प्रश्‍न लावून धरला आहे. ‘बोपखेल पुलासंदर्भात पालिकेचा चालढकलपणा’ या शीर्षकाखाली मंगळवारी (दि.8) ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत स्थायी समितीने बुधवारी (दि.9) तत्काळ हा निधी मंजूर केला. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.आयत्या वेळी हा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समितीसमोर मांडला. पुलासाठी जागा आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी जागेच्या बदल्यात 25 कोटी  81 लाख 51 हजार 200 रुपयांची मागणी संरक्षण विभागाने पालिकेकडे 4 एप्रिलच्या पत्राद्वारे केली होती.

रक्कम जमा केल्यानंतर जागेचे हस्तांतरण केले जाईल, असे त्यांची भूमिका होती. सदर पुलासाठी 42 कोटी रुपये खर्चास पालिकेच्या 20 जून 2016 च्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी विनामोबदला जागा मिळावी यासाठी पालिकेने 5 ऑक्टोबर 2016ला संरक्षण विभागास विनंती पत्र पाठविले होते. मात्र, संरक्षण विभागास त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. यावर सभेत चर्चा झाली. सीएमईने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 ला दापोडीतील सार्वजनिक रस्ता बोपखेलच्या नागरिकांना बंद केला होता. त्यामुळे तेथील नागरिकांना सुमारे 10 ते 15 किलोमीटर वळसा मारून ये-जा करावी लागत आहेत.

पुलासाठी झालेल्या आंदोलनात सुमारे 800 लोकांवर गुन्हा दाखल झाला होता. सुमारे 200 नागरिक तब्बल 15 दिवस तुरुंगात होते. पुलासाठी अनेक वेळा आंदोलनही केले गेले आहेत. तरीही पालिका संरक्षण विभागास तत्काळ रक्कम देण्यास तयार नसल्याबद्दल सदस्य विकास डोळस व विलास मडिगेरी यांनी नाराजी व्यक्त केली. डोळस म्हणाले की, पालिकेने आतापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी अनेकदा निधी अदा केला आहे. पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या जागेसाठी संरक्षण विभागाचे 30 जानेवारी 2018 ला पत्र मिळाले. त्यासाठी तत्काळ 22 कोटी रुपये पालिकेने अदा केले. असा असताना केवळ बोपखेल पुलासाठी प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बोपखेलला जोडणारा रस्ता पालिकेच्या 1997 व 2009 च्या डीपीमध्ये दाखविला असता तर, हा प्रश्‍न उद्धभवला नसता असे ते म्हणाले. अखेर या निधीस मान्यता देण्यास अध्यक्षा गायकवाड यांनी सहमती दिली. अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.

संबंधित निधी तत्काळ देणार : आयुक्त

पुलासाठी संरक्षण विभागाची जागेसाठी पालिका 25 कोटी 81 हजार निधी तत्काळ देणार असून, तसे पत्र पाठविले आहे. पालिकाहद्दीबाहेरील काम असल्याने सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. संरक्षण विभागाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर पुलाचे काम सुरू होईल. सन 2018-19 च्या अर्थसंकल्पातील विकास आराखड्यातील 140 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यातून हा खर्च केला जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. या प्रकरणात प्रशासनाने चालढकलपणा केल्याच्या ‘स्थायी’च्या आरोप त्यांनी फेटाळून लावला.