होमपेज › Pune › पालिकेचे 25 कर्मचारी ‘लाच’ प्रकरणात अटक

पालिकेचे 25 कर्मचारी ‘लाच’ प्रकरणात अटक

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 1:10AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत कामे करण्यासाठी ‘लाच’ घेण्याची परंपरा कायम आहे. त्यामुळे पालिका बदनाम होत आहे. आतापर्यंत तब्बल 25 कर्मचारी विविध कारणांसाठी ‘लाच’ घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ताब्यात आले आहेत. कारवाईची संख्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. हे प्रकार ‘शिस्तबद्ध’ आणि ‘पारदर्शक’ कारभार करणार्‍या सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात वाढल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

पालिकेतील 17 फेब्रुवारी 1997 ते 19  मे 2018 या कालावधीत तब्बल 25  कर्मचार्‍यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यापैकी 15 अधिकारी, कर्मचारी निर्दोष मुक्त होऊन सेवेत रुजू झाले आहेत. तर, एका कर्मचार्‍यांला सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, गतवर्षी सर्वाधिक लाचखोर कर्मचार्‍यांना रंगेहाथ पकडले होते. 22 मार्च ते 22 डिसेंबर  2017 या कालावधीत पालिकेतील 8 कर्मचार्‍यांना लाच स्वीकाराताना एसीबीने अटक केली. या प्रकारामुळे पालिकेची स्वच्छ प्रतिमेत डाळ लागत आहेत. फेबु्रवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचा कारभार सुरू झाला आहे. भाजपने ‘शिस्तीबद्ध’ आणि ‘पारदर्शक’ कारभाराचा नारा दिला आहे. ग्रामपंचायत ते दिल्लीपर्यंत ‘ना खाऊंगा, ना खाने दुगाँ’ हे तत्व पाळले जात असल्याचे पक्षाकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे. मात्र, पालिकेच भाजपच्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळातच सर्वांधिक संख्येने पालिका कर्मचारी ‘लाच’ म्हणून रक्कम स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. ही संख्या वाढतच असून, त्यास रोख लागत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

आयुक्तांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद

पालिकेचे कोणतेही काम करण्यासाठी किंवा फाईल व पत्रावर सही करण्यासाठी अधिकारी किंवा कर्मचारी रक्कम मागत असल्यास थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालिकेत रुजू होताना एप्रिल 2017 मध्ये केले होते. त्यानुसार तक्रारदार थेट एसीबीकडे तक्रार करीत आहेत. कामासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी नागरिकांची अडवणूक करू नये, त्यांची कामे ठरलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे सक्त आदेश  त्यांनी  सर्व विभागप्रमुख व शाखाप्रमुखांना बजावले होते. मात्र, त्यांच्या आदेशाकडेच अधिकारी व कर्मचारी साफ दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळेच अनेक कर्मचारी एसीबीच्या कचाट्यात सापडत असल्याचे समोर येत आहे.