Sun, Nov 18, 2018 01:15



होमपेज › Pune › पुणे : शिवसृष्टीसाठी २५ कोटींची तरतूद

पुणे : शिवसृष्टीसाठी २५ कोटींची तरतूद

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 12:34AM



पुणे ः प्रतिनिधी

कोथरूड येथील बीडीपीच्या जागेत साकारण्यात येणार्‍या शिवसृष्टीसाठी महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकरच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती; मात्र स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकात शिवसृष्टीसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी साकारण्याचे नियोजन गेल्या दहा वर्षांपासून आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात (डीपी) आरक्षण टाकण्यात आले आहे. याच जागेवर शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणार्‍या मेट्रो प्रकल्पाचा डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे. या जागेवर भूमिगत मेट्रो डेपो आणि वरील भागात शिवसृष्टी साकारण्याचे आश्‍वासन सत्ताधार्‍यांनी दिले होते; मात्र मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये कचरा डेपोची जागा मेट्रो स्टेशनला आणि चांदणी चौकाजवळील बीडीपीच्या 50 एकर जागेमध्ये शिवसृष्टी साकारण्यास मंजुरी देण्यात आली. 

ज्या दिवशी बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी साकारण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली, त्याच दिवशी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांच्याही शिवसृष्टीला शासनाने मंजुरी देऊन आर्थिक तरतूदही केली. एकाच दिवशी दोन शिवसृष्टींना मंजुरी दिल्याने भाजपच्या धोरणावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यातच आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात कोथरूड येथील शिवसृष्टीस एक रुपयाचीही तरतूद केली नाही. त्यामुळे कोथरूड येथील शिवसृष्टीसंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड येथील शिवसृष्टीस 25 कोटी रुपयाची तरतूद केल्याने शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे.

आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक

आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळावर स्मारक करण्यासाठी संगमवाडी येथे जागा आरक्षित होती. हे आरक्षण राज्य सरकारने कायम केल्याने त्या जागेवर स्मारक उभारणीसाठी 1.5 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.