Sat, May 25, 2019 22:35होमपेज › Pune › अपंगत्व आलेल्या व्यापार्‍याला २४ लाखांची नुकसानभरपाई

अपंगत्व आलेल्या व्यापार्‍याला २४ लाखांची नुकसानभरपाई

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी 

अपघातात उजवा हात गमवावा लागलेल्या व्यापार्‍याला रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये दिलासा मिळाला असून मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दाखल असलेला दावा तडजोडीअंती निकाली काढण्यात आला. त्यांना 24 लाख 50 हजार रुपये देण्याचा निर्णय   सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या पॅनेलने घेतला. 

संदीप बजरंग गावडे (वय 38, राजगुरूनगर) असे त्या व्यापार्‍याचे नाव आहे. गावडे हे खेड मार्केट यार्डमध्ये व्यापार करतात. 22 फेब्रुवारी रोजी ते चाकण परिसरातून दुचाकीवरून चालले होते. एका चौकात सिग्नलवर थांबले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. त्यानंतर ट्रकचे चाक त्यांच्या उजव्या हातावरून गेले. परिणामी त्यांचा उजवा हात खांद्यापासून निकामी झाला.

या पार्श्‍वभूमीवर नुकसानभरपाई मिळावी, यासाठी गावडे यांनी अ‍ॅड. अनिल पटणी आणि अ‍ॅड. आशिष पटणी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. गावडे यांचे वय 38 आहे. त्यांना आलेल्या अपंगत्त्वाचा विचार करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, असा दावा अ‍ॅड. पटणी यांनी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे ट्रकची विमा कंपनी असलेल्या ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीच्या विरोधात दाखल करण्यात आला होता. रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये 24 लाख 50 हजार रुपये देत तडजोडीअंती हा दावा निकाली काढण्यात आला. तडजोडीसाठी अ‍ॅड. अनिल पटणी आणि अ‍ॅड. आशिष पटणी आणि ओरिएंटल विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक जोशी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.