Sun, May 26, 2019 10:36होमपेज › Pune › चिंचवड विधानसभा मतदारसंघातील २ हजार ३५५ मतदार वगळणार

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील २ हजार ३५५ मतदार वगळणार

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:38PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या अंतर्गत चिंचवड मतदारसंघातील एकूण 2 हजार 355 मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. या संदर्भात हरकती व सूचना 30 ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

चिंचवड मतदारसंघाच्या मतदार यादीत 977 मयत,  767 दुबार व 611 स्थलांतरित असे एकूण 2 हजार 355 मतदार आहेत. त्यांना निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे. निवडणूक प्रतिनिधी यासंदर्भात समक्ष पाहणी करून अहवाल सादर केला आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 चे कलम 22 आणि मतदार नोंदणी अधिनियम 1960 चा नियम 21 अ अन्वये मतदारांना वगळणेबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. सदर मतदारांच्या याद्या जिल्हा निवडणूक कार्यालय, पालिकेच्या संकेतस्थळावर आणि थेरगाव येथील कार्यालयात 30 ऑगस्टपर्यंत उपलब्ध आहेत.

हरकती/ सूचना 30 ऑगस्ट सायंकाळी 5.30 पर्यंत थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय येथील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. मुदतीनंतर कोणत्याही पात्र मतदारास दावे व हरकती दाखल करावयाचे असल्यास नव्याने नमुना क्रमांक 6, 7, 8 व 8 अ द्वारे कार्यालयामध्ये अर्ज दाखल करता येणार आहेत. नागरिकांनी मतदार यादीमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.