Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › व्हॉट्सअप, सोशल मीडिया आणि एजंटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवणे भोवले 

मुख्य सूत्रधारासह २३ जणांवर मोक्का

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 19 2017 1:04AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया तसेच एजंटच्या माध्यमातून सेक्स रॅकेटचे जाळे चालविणार्‍या मुख्य सूत्रधारासह 23 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखा उपायुक्त पंकज डहाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेमुळे सेक्स रॅकेट चालविणार्‍यांमध्ये दहशत पसरली आहे. तर, शहरातील बड्या सेक्स रॅकेटला पायबंद घालण्यात यश आले आहे. 

प्रताप अंतरयामी साहू (वय 26, रा. उबाळेनगर, वाघोली, मूळ ओरिसा), लिपुन अंतरयाती साहू (वय 23), अमरेंद्र इश्‍वरचंद्र साहू (वय 28), अजय लोकबहादूर गिरी (वय 25, रा. मुंढवा, मूळ आसाम), बिंकू टंकबहादूर छेत्री (वय 26), शांती लक्ष्मण गिरी (वय 25), रमेश रुद्रबहाद्दूर गिरी (वय 30), बाबूराम भीमबहाद्दूर गिरी (वय 19) अशी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे असून, या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर, त्यांचे इतर 15 साथीदार फरार आहेत.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गेल्या महिन्यात येरवडा परिसरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा टाकून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याठिकाणांवरून उजबेकिस्तान देशातील तरुणींसह तिघींची सुटका केली होती. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील करीत होते. त्यावेळी लिपुन साहू हा शहरात परदेशातील तसेच देशातील मुलींकडून सेक्स रॅकेट चालवतो. तो व्हॉट्सअप, सोशल मीडिया तसेच एजंटच्या माध्यमातून विविध भागांमध्ये हॉटेल आणि फ्लॅटवर सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समोर आले.

गेल्या काही दिवसांपासून या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. त्यावेळी पोलिसांना लिपुन साहू हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. तसेच, तो एजंट आणि इतर 23 जणांच्या मदतीने हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर आरोपींना पायबंद घालण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार, देशपांडे यांनी आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाईचे आदेश दिले. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सह पोलिस आयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.