होमपेज › Pune › 8 कार्यकारी अभियंत्यांसह 223 जणांच्या बदल्या

8 कार्यकारी अभियंत्यांसह 223 जणांच्या बदल्या

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 12 2018 1:05AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ कार्यकारी अभियंत्यांसह एकूण 223 अधिकारी, कर्मचार्‍यांच्या विभागाअंतर्गत बदल्या  करण्यात आल्या आहेत. वर्ग 1 च्या 8, वर्ग 2 च्या 22, वर्ग 3 च्या 192, वर्ग 4 च्या एका कर्मचार्‍याचा यात समावेश आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी रजेवर जाण्यापूर्वी सह्या केलेले हे आदेश प्रशासनाने आज (शुक्रवारी) प्रसिध्द केले. इच्छेप्रमाणे विभाग न मिळाल्याने काहींनी बदल्या थांबविण्यासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर दि. 11 मे ते  दि. 2 जूनदरम्यान रजेवर आहेत. त्यांच्या जागी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे. आयुक्त हर्डीकर यांनी रजेवर जाण्यापूर्वी गुरुवारी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या आदेशावर सह्या केल्या  होत्या. ते आदेश आज प्रशासनाने संकेतस्थळावरून प्रसिद्ध केले.स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांची प्रशासनमधून बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागात, श्रीकांत सवणे यांची स्थापत्य बीआरटीएस विभागातून बांधकाम परवाना विभागात बदली झाली आहे. 

प्रशांत पाटील यांची बांधकाम परवानामधून पाणीपुरवठा विभागात, मनोज शेठीया यांची बांधकाम परवाना विभागातून प्रशासन, दक्षता व नियंत्रण विभागात बदली करण्यात आली आहे. देवन्ना गट्टूवार यांची पाणीपुरवठा, जलनिस्सारण विभागातून ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागात, तर प्रमोद ओंभासे यांची ड क्षेत्रीय कार्यालयातून स्थापत्य बीआरटीएसमध्ये बदली झाली आहे. विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता बाबासाहेब गलबले यांची जलशुद्धिकरण मधून ड क्षेत्रीय कार्यालय विद्युत विभागात, तर संदेश चव्हाण यांची ‘ड’ क्षेत्रीय विद्युतमधून जलशुद्धीकरण विभागात बदली करण्यात आली आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी मिळून 223 जणांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात उपअभियंता 20, लेखाधिकारी 2, लघुलेखक 6, आरोग्य निरीक्षक 2, फार्मासिस्ट 12, कनिष्ठ अभियंता 4, कॉम्प्युटर ऑपरेटर 14, मुख्य लिपिक 33, लिपिक 103, लेखापाल 4, उपलेखापाल 13, लायब्ररी अटेंडंट 1, शिपाई 1 अशा विविध पदांवरील 223 जणांचा समावेश आहे.