Sat, Aug 17, 2019 17:10होमपेज › Pune › बांधकाम कामगार नोंदणीचे २२०० अर्ज धूळखात

बांधकाम कामगार नोंदणीचे २२०० अर्ज धूळखात

Published On: Mar 01 2018 1:29AM | Last Updated: Mar 01 2018 12:57AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

बँक खाते नसल्यामुळे बांधकाम कामगारांच्या नोंदणीला कामगार आयुक्‍त कार्यालयातून नकार मिळत आहे, तर कोणतेही एक ओळखपत्र असल्यास नोंदणी करता येते, असा राज्य शासनाचा अध्यादेश आहे. कामगार आयुक्‍त कार्यालय शासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवत असल्यामुळे बांधकाम कामगार सेनेने नोंदणीसाठी पाठविलेले 2 हजार, 200 अर्ज धूळखात पडले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2002 च्या सर्वेक्षणानुसार शहरात सुमारे 71 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमधील जवळपास 75 टक्केकामगार बांधकाम क्षेत्राशी निगडित आहेत. भोसरी नाका, रहाटणी नाका, डांगे चौक नाका, मोरे वस्ती, चिखली नाका, नागसेननगर, बिजलीनगर अशा छोट्या-मोठ्या नाक्यांवर हजारोंच्या संख्येने कामगार रोज सकाळी कामाच्या आशेने हजर असतात. या कामगारांना नोंदणीसाठी प्रमाणपत्र देण्यास कुणीही तयार होत नसल्यामुळे, हे हजारो कामगार आजही नोंदणी व मिळणार्‍या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत आहेत. एकाच ठिकाणी नव्वद दिवस कामाला असल्यास बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा नियम आहे; मात्र कामगार कोणत्याही एका ठिकाणी कायमस्वरूपी काम करत नाहीत. 

अनेक प्रकल्पांवर कामगार ठेकेदारी पद्धतीने काम करत असतात. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही. बांधकाम कामगार सेनेने कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे सादर केलेले सुमारे 2 हजार, 200 अर्ज नोंदणीअभावी धूळखात पडून आहेत.

राज्य शासनाने 2014 मध्ये अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार बांधकाम कामगाराकडे आधारकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र असले, तरी नोंदणी करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे; मात्र कामगार आयुक्‍त कार्यालयातून बँकेचे खाते काढण्याच्या सूचना कामगारांना दिल्या आहेत. त्यानंतर नोंदणी करू, असे सांगितले जात आहे, तर बँकेमधून रहिवासी पुरावा अथवा कामगार आयुक्‍तांनी दिलेले ओळखपत्र मागितले जात आहे.

अनेक बांधकाम कामगार बाहेरच्या राज्यांतून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना रहिवासी पुरावा मिळण्यास अडचण येत आहे, तर नोंदणी असल्याशिवाय कामगार आयुक्‍त ओळखपत्र देत नाहीत. कामगार आयुक्‍त कार्यालयाच्या अनास्थेचा कामगारांना मात्र त्याचा फटका बसत आहे.  याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता आम्ही तात्पुरती नोंदणी करून घेऊन अर्ज बँकेकडे देण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगितले.