होमपेज › Pune › डेंग्यूच्या 217 संशयित रुग्णांपैकी 10 पॉझिटिव्ह

डेंग्यूच्या 217 संशयित रुग्णांपैकी 10 पॉझिटिव्ह

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 27 2018 10:20PMपिंपरी : शहरात डेंग्यूचा धोकाही वाढत आहे. डेंग्यूने आजारी पडणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जुलै महिन्यामध्ये आत्तापर्यंत 217 संशयित रुग्णांपैकी डेंग्यूचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर मलेरियाचे 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून दिली आहे. 

कीटकजन्य आजारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, तरीही महापालिका स्तरावर डेंग्यूबाबत अनास्था असल्याचे चित्र आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. जून महिन्यामध्ये 5069 तापाच्या केसेसमध्ये मलेरियाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. आणि डेंग्यूचे 94 संशयित रुग्ण होते. जुलै महिन्यात  3815 तापाच्या केसेसमध्ये मलेरियाचे 7 पॉझिटिव्ह तर डेंग्यूच्या 217 संशयित रुग्णांमध्ये 10 रुग्ण आढळले आहेत. 

शहरामध्ये स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे.  परिणामी कीटकांमुळे उद्भवणारे आजार वाढत आहेत. या आजाराकडे दुर्लक्ष केले, तर तो प्राणघातक ठरू शकतो. या आजारावर उपचार उपलब्ध आहेत. पण, तो होऊ नये यासाठी काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात डेंग्यू झालेला आहे हे लक्षात आले तर तो नियंत्रणात आणता येऊ शकतो. पण, दुसर्‍या टप्प्यात जर  डेंग्यूचे विषाणू गेले असतील, तर त्यात  प्लेटलेटस कमी होतात. अशा वेळी रक्तस्रावाची भीती असते. श्‍वसनाला त्रास होऊ शकतो. ही स्थिती शेवटची असते. पण तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी रुग्णाला रुग्णालयात हलविणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार होणे गरजेचे आहे.

महापालिकेचा कंटेनर तपासणी अहवाल 

डेंग्यू आणि इतर डासांपासून होणार्‍या आजरांस प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन साठविलेल्या पाण्याची तपासणी केली जाते. यामध्ये जुलै महिन्यात 43562 घरांची तपासणी केली. यात 1342 घरांमध्ये डासांच्या अळ्या सापडल्या, तर 134211 इतकी कंटेनर तपासणी केली. त्यापैकी 1964 कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या सापडल्या; तसेच 201 टायर पंक्‍चर, भंगार दुकाने तपासण्यात आली व 172 बांधकामांच्या ठिकाणाची तपासणी करण्यात आली.