Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Pune › पालिकेचा ५ हजार २३५ कोटींचा अर्थसंकल्प सादर

पालिकेचा ५ हजार २३५ कोटींचा अर्थसंकल्प सादर

Published On: Feb 16 2018 1:51AM | Last Updated: Feb 16 2018 12:02AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2018-2019 या आर्थिक वर्षाचा आरंभीच्या मूळ 3 हजार 506 कोटी 62 लाख 8 हजार 354 रुपयांचा आणि केंद्राच्या जेएनएनयूआरएम निधीसह 5 हजार 235 कोटी 23 लाख रुपयांचा 36 वा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांना गुरुवारी (दि. 15) सादर केला. 

महापालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेस मुख्य लेखापाल राजेश लांडे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.  

गेल्या वर्षी 2017-2018चा आरंभीच्या शिलकीसह 3 हजार 48 कोटींचा व जेएनएनयूआरएमच्या निधीसह 4 हजार 805 कोटींचा अर्थसंकल्प होता. यंदा त्यात अनुक्रमे तब्बल 458 कोटी आणि 430 कोटींनी वाढ दर्शविण्यात आली आहे. 

अर्थसंकल्पात प्रमुख कामांसाठी भरीव तरतूद आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी, मेट्रो आणि अमृत अभियान योजना या प्रमुख कामांचा समावेश आहे. सन 2018-2019 च्या आगामी अर्थसंकल्पात शून्य व टोकन तरतूद असलेले सर्व लेखाशीर्ष वगळण्यात आले आहेत. जेवढ्या रकमेचे काम आहे तेवढ्याच रकमेची निविदा काढायची, त्यासाठी तेवढीच रक्कम अर्थसंकल्पात ठेवण्यात आली आहे. चालू विकासकामांसाठी 100 टक्के तरतूद केली असून, त्याला निधीची कमतरता भासली जाणार नाही, असे नियोजन केले आहे. त्यामुळे तब्बल 265 पाने यंदा अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेतून कमी झाली आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांसमोर प्रमुख कामे वेळेत पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ असणार आहे. टोकन निधी रद्द केल्याने पालिकेला आर्थिक शिस्त लागेल, असा प्रशासनाचा दावा आहे.

पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. मिळकतकरात पाणीपुरवठा लाभ करवाढीचा प्रस्ताव आहे.  त्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. अद्याप त्याला  सर्वसाधारण सभेची मान्यता मिळालेली नाही. मिळकतकरात प्रत्यक्ष वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार नाही. थकबाकीदार मिळकतदारांकडून वसुलीची संख्या वाढविणे. मिळकतीमध्ये वाढीव बांधकाम करूनही नोंद न केलेल्या मिळकतींचा शोध घेऊन वसुलीचे ‘टार्गेट’ 100 टक्के करण्यावर भर असणार आहे. आवश्यकता भासल्यास विविध प्रकारचे उत्पन्नाचे स्रोत वाढीवर भर देण्यात दिला आहे. मिळकतीचा शोध घेणे, बॉण्ड विकणे, खासगी भागीदारामार्फत विकासकामे राबविणे आदींचा विचार केला जाणार आहे. 

शहराचा सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प 

अर्थसंकल्प प्रथमदर्शनी उत्तम आहे. आयुक्तांनी शहराचा सर्वांगीण विकास होण्याचा दृष्टीने काटेकोर अर्थसंकल्प तयार केला आहे. तो लोकाभिमुख आहे, अशी प्रतिक्रिया स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली. त्यात मागील सत्ताधार्‍यांप्रमाणे गाजराची शेती नसल्याचे त्या म्हणाल्या. 

महत्त्वाचे प्रकल्प मुदतीमध्ये पूर्णचे ध्येय

अर्थसंकल्पात प्राधान्याने करावयाच्या कामांची भरीव तरतूद आहे.  पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी, मेट्रो आणि अमृत अभियान योजना या कामांचा समावेश आहे. मेट्रोसाठी 50 कोटींची तरतूद आहे. जेएनएनयूआरएमच्या बीआरटीएस व घरकुल योजनेची कामे अंतिम टप्प्यात आहेत. प्रमुख कामे मुदतीत पूर्णचे ध्येय ठेवल्याचे आयुक्त म्हणाले. 

विशेष योजना

शहरातील गरिबांसाठी (बीएसयूपी) 928 कोटी 89 लाख निधीची तरतूद
महिलांच्या विविध योजनांसाठी 33 कोटींची भरीव तरतूद
दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी 20 कोटी
पीएमपीएलसाठी 164 कोटी 56 लाखांची तरतूद
समाविष्ट गावांतील भूसंपादनासाठी 140 कोटी

रुग्ण सेवा योजना

बापूजीनगर, थेरगावातील 48 कोटी 93 लाख खर्चाच्या 200 खाटांच्या अद्ययावत रुग्णालयासाठी 22 कोटींची तरतूद
मासुळकर कॉलनीतील नागरी आरोग्य केंद्र, नेत्र रुग्णालय व निवासी डॉक्टर वसतिगृह बांधण्यासाठी 8 कोटी 68 लाख

केंद्राच्या योजना

पंतप्रधान आवास योजनेसाठी 92.45 कोटी
स्वच्छ भारत अभियानासाठी 28 कोटी रुपये
स्मार्ट सिटीसाठी 100 कोटी
दापोडी ते पिंपरीपर्यंतच्या मेट्रो प्रकल्पासाठी 
50 कोटींच्या महापालिका हिश्श्याची तरतूद
बीआरटीसाठी इलेक्ट्रॉनिक वातानुकूलित बस खरेदीसाठी 5 कोटी रुपये
अमृत योजनेत जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी 81 कोटींची तरतूद

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये

रस्ते कामांसाठी भरीव तरतूद
निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ग्रेडसेपरेटर व उड्डाणपूल बांधण्यासाठी 33 कोटी तरतूद
भक्ती-शक्ती चौक ते किवळेतील मुकाई चौक रस्त्यासाठी 12 कोटी
18 मीटर डीपी रस्त्यास चिंचवड व थेरगाव यांना जोडणार्‍या पवना नदीवरील पूल बांधण्यासाठी 10 कोटी 
बोपखेल-आळंदी 60 मीटर रस्त्यासाठीच्या चार पॅकेजसाठी 10 कोटी 60 लाख
नाशिक फाटा ते वाकड बीआरटी रस्त्यावर साई चौक, रहाटणी येथे दोन समांतर ग्रेडसेपरेटर बांधण्यासाठी 20 कोटी 
पुणे-नाशिक महामार्गावरील पांजरपोळ चौक ते आळंदी रस्त्यापर्यंतचा रस्ता विकसित करण्यासाठी 10 कोटींची तरतूद
रहाटणी, कोकणे चौक ते काळेवाडी फाटा चौकापर्यंत 30 मीटरचा रिंग रोड विकसित करण्यासाठी 16 कोटींची तरतूद
दापोडीतील हॅरिस पुलाला समांतर दोन पुलांसाठी 10 कोटी 50 लाखांची तरतूद
काळेवाडी फाटा येथे वाकड-कस्पटे वस्ती ते काळेवाडी ग्रेडसेपरेटर बांधण्यासाठी 1 कोटी 12 लाखांची तरतूद
गोविंद यशदा चौक, पिंपळे सौदागर येथे अंडरपाससाठी 6 कोटी 5 लाखांची तरतूद

दिव्यांगांचे सांस्कृतिक केंद्र, उद्यान, बालनगरी व इतर

पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलाशेजारी दिव्यांगांसाठी वैशिष्ट्यपूर्ण असे सांस्कृतिक केंद्र बांधण्यासाठी 5 कोटींची तरतूद
चिंचवडगाव, रुपीनगरमधील 12 कोटींची अद्ययावत स्मशानभूमी बांधण्यासाठी 6 कोटींची तरतूद
एमआयडीसी, भोसरीतील जे ब्लॉकमध्ये बालनगरी विकसित करण्यासाठी 8 कोटी
चर्‍होलीत उद्यान विकसित करण्यासाठी 1 कोटी 50 लाख
पुनावळेत उद्याने विकसित करण्यासाठी 1 कोटी

आयुक्त व्हीलचेअरवर

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या पायाला इजा झाल्याने प्लॅस्टर लावले आहे. त्यामुळे त्यांना चालता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून ते पालिकेत न येता आयुक्त बंगल्यातून कामकाज करीत आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ते पालिका भवनात व्हीलचेअरवर आले. 

आयुक्त वेटिंगवर 

दरम्यान, आयुक्त व्हीलचेअरवर सकाळी 11 ला सभागृहात दाखल झाले; मात्र स्थायी समितीचे सदस्य व पदाधिकारी सुमारे 20 ते 30 मिनिटे उशिराने उपस्थित झाले. त्यामुळे आयुक्त व इतर अधिकार्‍यांना नाईलाजास्तव वाट पाहत बसावे लागले.