Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Pune › ३१ डिसेंबरसाठी २०० ‘वन डे बार’

३१ डिसेंबरसाठी २०० ‘वन डे बार’

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 26 2017 12:04AM

बुकमार्क करा

पुणे : समीर सय्यद

सांस्कृतिक पुणे शहराने आयटी हबची जागा घेतली अन् शुभेच्छा देऊन नववर्षाचे स्वागत करणारे पुणेकर आता ‘झिंगाट’ होऊन नववर्षाचे स्वागत करण्यात पुढाकार घेत असल्याचे दिसत आहेत. शहरात अधिकृत हजारो मद्यालये असतानाही केवळ थर्टी फस्टचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी तब्बल 200 एकदिवसीय मद्यालये पुणेकरांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहेत. यातून तरुणाई ‘झिंगाट’ होणार असली तरी, दुसरीकडे यामुळे पालक चिंतेत पडले आहेत. 

पेठांमध्ये वसलेल्या पुण्याने आता मोठा आकार धारण केला आहे. आयटी हब, शिक्षण आणि नोकरी, व्यवसायासाठी शहरात येणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यातही नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुण्यात येणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे. ‘थर्टी फर्स्ट’चे सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाई दूरवरून प्रवास करून पुण्यात दाखल होते. 

शहरासह उनगरांमध्ये ‘थर्टी फस्ट’चे स्वागत करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी हॉटेल्स, बार, रेस्टॉरेंन्ट, रिसॉर्टमध्ये आयोजकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांच्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक दिवसीय मद्यविक्रीचा परवाना उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री सुमारे 200 मद्यालये सुरू होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या पार्ट्यांसाठी हॉटेल, क्लब आणि रिसॉर्ट सज्ज झाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या आकर्षक योजनाही आणल्या आहेत. परंतु उत्पादक शुल्क खात्याच्या नियमामुळे या पार्टीचा काहिसा रसभंग होण्याची शक्यता आहे. 

कारण मद्यपान करण्यासाठी वैयक्तिक परवाना बंधनकारक आहे. तसेच आयोजकांकडेही जर परवाना नसेल तर, कारवाई होणार आहे. पार्टीमध्ये 100 पेक्षा कमी लोक असतील तर, 10 हजार 50 रुपये आणि 100 पेक्षा अधिक लोक येणार असतील तर, 15 हजार 50 रुपये शुल्क भरून परवाना घ्यावा लागणार आहे.

नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर देशी, विदेशी मद्याची विक्री होत असते. अशा वेळी बनावट मद्यविक्रीची होण्याची शक्यता अधिक आहे. नववर्षाचे वेध लागताच गेवा येथील निर्मित विदेशी मद्य चोरट्या मार्गाने आयात केले जाते. हे रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची पथके सज्ज झाली आहेत.

पार्ट्यांचे निमंत्रण सोशल मीडियावरुन

फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्प या सोशल मीडियाचा वापर चांगल्या तसेच वाईटही कामांसाठी केला जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. आता हॉटेल्स, बार, रेस्टॉरेंन्ट, रिसॉर्टमध्ये आयोजित केलेल्या पार्ट्यांसाठी सोशल मीडियावरून निमंत्रण दिले जात आहे. पार्टीमध्ये प्रवेशासाठी 500 ते 10 हजारापेक्षा अधिक मोजावे लागत आहेत.