Thu, Jul 18, 2019 17:04होमपेज › Pune › काळेवाडीत टोळक्याकडून २० वाहनांची तोडफोड 

काळेवाडीत टोळक्याकडून २० वाहनांची तोडफोड 

Published On: May 24 2018 11:13AM | Last Updated: May 24 2018 11:13AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात टोळक्याची दहशत माजवण्याचे प्रकार काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. यातच दहशत माजवण्याचा सर्वांत पहिला प्रकार म्हणजे रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करणे. गेल्‍या दिड-दोन वर्षांपासून शहराला लागलेली वाहन तोडफोडीची किड काढण्याचे काम अद्याप तरी पोलिसांना जमलेले नाही. यामुळेच पुन्हा एकदा वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडीमध्ये तीन-चार जणांच्या टोळक्याने सुमारे २० वाहनांची तोडफोड करुन मोठे नुकसान केले. 

नागरिकांनी तोडफोड करणार्‍या एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी महेश मुरलीधर तारु (वय, ४३, रा. नखातेनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी तोडफोड करणार्‍या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन आलेल्‍या टोळक्‍याने आरडा-ओरडा करत कोयते आणि दांडक्‍याने  रस्त्यावर उभा असणार्‍या वाहनांची तोडफोड सुरु केली. धनगरबाबा मंदिर, नखातेनगर, नम्रता हौसिंग सोसायटी येथील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी तोडफोड करणार्‍यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकाने कोयत्याचा धाक दाखवून खिशातील एक हजार रुपये काढून घेतले आणि त्‍याला धमकी दिली. या टोळक्याने परिसरातील तब्बल २० वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. नागरिकांनी पोलिसांना एकाला पकडून दिले असून, इतर दोघे फरार आहेत. याबाबत वाकड पोलिस  तपास  करत आहेत.