Tue, Apr 23, 2019 10:17होमपेज › Pune › अल्पवयीन मुलांकडून 20 दुचाकी जप्‍त

अल्पवयीन मुलांकडून 20 दुचाकी जप्‍त

Published On: Apr 21 2018 1:20AM | Last Updated: Apr 21 2018 1:19AMपिंपरी : प्रतिनिधी

निगडी पोलिसांकडून दोन अल्पवयीन मुलांकडून चोरीच्या विविध कंपन्यांच्या 20 दुचाकी जप्‍त करण्यात आल्या. यासह 7 लाख 33 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे 9 पोलीस ठाण्यातील 16 गुन्हे उघडकीस आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी निगडी पोलिसांनी स्वतंत्र टीम तयार करून तपास केला. ही टीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना चिंचवड मधील बर्ड व्हॅली उद्यानाजवळ दोन अल्पवयीन मुले चोरीच्या दुचाकीसोबत उभी असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता, ती दुचाकी चोरीची असून दुचाकीची नंबरप्लेट बदलून खोटी नंबरप्लेट लावल्याचे आढळले. 

दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी 20 दुचाकी चोरल्याची माहिती समजली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शहराच्या विविध भागातून सर्व दुचाकी जप्त केल्या; तसेच ताब्यात घेतलेल्या दोघांनी काही दुचाकी संजय लक्ष्मण गुदडावत (वय 32, रा. भिवरेवाडी मरकळ, ता. हवेली, पुणे), शिवभगत राजकमल बिरावत (वय 28, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, पुणे), इकबाल रामसिंग नाणावत (वय 26, रा. अष्टापुर फाटा, हवेली, पुणे) यांना विकल्या होत्या. चोरीची वाहने खरेदी केल्याप्रकरणी वरील तिघांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. 

यामुळे निगडी पोलीस ठाण्यातील 6 गुन्हे, चाकण पोलीस ठाण्यातील 2 गुन्हे, आळंदी पोलीस ठाण्यातील 2, भोसरी एमआयडीसी, पिंपरी, डेक्कन, देहूरोड, लोणीकंद, यवत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 9 पोलीस ठाण्यातील 16 गुन्हे उघडकीस आले आहेत.  ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे, तात्या तापकीर, फारुख मुल्ला, नितीन बहिरट, मंगेश गायकवाड, नारायण जाधव, रमेश मावसकर, राम साबळे, जमीर तांबोळी, किशोर पढेर, विलास केकाण, मच्छिंद्र घनवट आदींनी केली.

Tags : Pimpri, 20, bike, seized, minors