Wed, Jul 15, 2020 14:05होमपेज › Pune › #CycloneNisarga तटवर्ती भागात एनडीआरएफची २० पथके रवाना

#CycloneNisarga तटवर्ती भागात एनडीआरएफची २० पथके रवाना

Last Updated: Jun 03 2020 11:15AM

एनडीआरएफच्या सुदुंबरे येथील पाचव्या बटालियनचे डेप्युटी कमांडंर सच्चिदानंद गावडेदेहूरोड : पुढारी वृत्तसेवा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्यातील अलिबाग किनाऱ्याला बसण्याचा अधिक धोका आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात एनडीआरएफचे २० पथके रवाना करण्यात आले आहेत. परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्थानिक प्रशासन राज्याचा मदत व पुनर्वसन विभाग आणि एनडीआरएफ सज्ज झाले आहे.

एनडीआरएफच्या सुदुंबरे येथील पाचव्या बटालियनचे डेप्युटी कमांडंर सच्चिदानंद गावडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, निसर्ग चक्रीवादळाचा राज्याच्या किनारपट्टी भागाला धोका आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तटावर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर सर्व पूर्वतयारी केली असून एनडीआरएफची २० पथके विविध जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहेत. यातील पंधरा पथके महाराष्ट्रातील असून पाच पथके विशेष विमानाने विशाखापटनम येथून येत आहेत. 

राज्यातील पंधरा पथकांपैकी पालघर २, ठाणे २, रायगड ४, नवी मुंबई ३, रत्नागिरी २ आणि सिंधुदुर्ग १ अशी जिल्हानिहाय पथके तैनात करण्यात आली आहेत. किनारपट्टी चा सखल भाग तसेच लोकवस्तीच्या ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ जवानांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वादळा विषयी जागृती निर्माण केली जात आहे. तसेच, वादळात काय करावे व काय करू नये याबाबत नागरिकांना माहितीही देण्यात आली आहे. 

जगभरात सध्या कोविड १९ विषाणूचा संसर्ग रोगाने थैमान घातलेले आहे. राज्यात यापार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. अशा परिस्थितीत साथरोगाशी आणि चक्रीवादळाची एकाच वेळी दुहेरी लढा द्यावा लागणार आहे. अशी परिस्थिती हाताळण्यासाठी जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून अत्याधुनिक साधनसामग्री पुरविण्यात आली आहे, अशी माहिती गावडे यांनी दिली.

सरकारने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. मदत कार्य करणाऱ्या जवानांना सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.