Thu, Apr 25, 2019 15:41होमपेज › Pune › शहरात पावणे २ लाख अनधिकृत बांधकामे

शहरात पावणे २ लाख अनधिकृत बांधकामे

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:26AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 4 लाख 78 हजार 787 बांधकामांची नोंद पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन कार्यालयाकडे झाली आहे. त्यापैकी तब्बल 1 लाख 73 हजार 488 बांधकाम अनधिकृत व विनापरवाना आहेत. त्यावरून शहरात अनधिकृत बांधकामे वाढतच असल्याचे धक्कादायक चित्र आहे. 

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी शनिवारच्या (दि.19) पालिका सर्वसाधारण सभेत या संदर्भातील प्रश्‍न उपस्थित करून, त्या संदर्भात प्रशासनाकडून उत्तरांची मागणी केली होती. त्या अंतर्गत प्रशासनाने दिलेल्या उत्तरामध्ये ही बाब समोर आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पालिका अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे कागदोपत्री दाखवित असले तरी, अशी बांधकामे शहरातील विविध भागांत वाढतच आहेत.

त्यास पालिका अधिकार्‍यांसह राजकीय पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.  शहरात सध्या एकूण 4 लाख 78 हजार 787 नोंदणीकृत बांधकामे आहेत. त्याकडून पालिका नियमितपणे कर आकारणी करीत आहे. अनधिकृत बांधकामधारकांकडून शास्तीकर ही वसुल केला जात आहे. त्यापैकी एकूण 3 लाख 13 हजार 85 बांधकामे नियमित आहेत. तर, 1 लाख 73 हजार 488 बांधकामे अनधिकृत व विनापरवाना आहेत. 

56 अर्जांपैकी एकही अनधिकृत बांधकामे नियमित नाही-

राज्य शासनाने 7 ऑक्टोबर 2017ला काढलेल्या अधिसूचनेनुसार 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी केवळ56 अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एकही बांधकाम नियमित झालेले नाही, असे पालिकेने दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. अर्ज स्वीकृतीची मुदत 30 एप्रिलला संपली आहे. त्यामुळे ही योजना फसवी असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप राहुल कलाटे यांनी केला आहे. 

केवळ नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी ही अभय योजना सत्ताधारी भाजपने अंमलात आणली होती. सत्ताधार्‍यांनी या संदर्भात शहरभर फ्लेक्स लावून स्वत:ची पाठही थोपटून घेतली होती. तसेच, साखर व मिठाई वाटपही केले होते. या योजनेत एकाही नागरिकांला लाभ झाला नसल्याचे सत्ताधारी उघडे पडले आहेत, असा आरोप कलाटे यांनी केला आहे.

तीन वर्षांत 2 हजार 397 अनधिकृत बांधकामांवर कारवाई

न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग स्थापन केला. या विभागाच्या वतीने 1 जून 2015 ते 30 एप्रिल 2018 या कालावधीत एकूण 2 हजार 397 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. एकूण 1 हजार 39 अनधिकृत बांधकामांवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल झाले. कारवाईसाठी बांंधकाम परवाना विभागातील 3 कार्यकारी अधियंता, 12 उपअभियंता, 16 कनिष्ठ अभियंता, 63 बीट निरीक्षक, मजूर, पालिका पोलिस, तसेच स्थानिक पोलिस बंदोबस्त वापरण्यात आला.

बांधकामे पाडण्यासाठी जेसीबी, पोकलॅण्ड, डंपर आदी यांत्रिक वाहनांचा वापर झाला. वाहनांसाठी आतापर्यंत एकूण 1 कोटी 66 लाख 50 हजार इतका खर्च झाला. दरम्यान, भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर 1 मार्च 2017 नंतर ते 30 एप्रिल 2018 या 14 महिन्यांच्या कालावधीत एकूण 4 हजार 7 अनधिकृत बांधकामांना नोटीस दिली आहे. एकूण 1 हजार 247 अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली तर, 307 तक्रारीची पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले.