Sun, Mar 24, 2019 04:44होमपेज › Pune › २ कोटी १७ लाखांची बिल्डरची फसवणूक

२ कोटी १७ लाखांची बिल्डरची फसवणूक

Published On: Feb 02 2018 1:43AM | Last Updated: Feb 02 2018 1:13AMपुणे ः प्रतिनिधी

भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करण्याच्या बहाण्याने  बांधकाम व्यावसायिकाची तब्बल दोन कोटी 17 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकणी मंगेश महादेव महांगरे (वय 37, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून गजानन महाराज गृहरचना संस्थेचे संचालक रणजित पिसाळ-देशमुख, त्यांची पत्नी सुक्रिता पिसाळ, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सचिव जालिंदर दादासाहेब डुंबरे पाटील तसेच  संस्थेचे सर्व सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फसवणुकीचा प्रकार 2013 ते 2015 दरम्यान घडला आहे. याप्रकरणी अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी फिर्यादी महांगरे यांच्या वतीने न्यायालयात 156/3 नुसार प्रकरण दाखल केले होते. त्याबाबत न्यायालयाने 5 जानेवारीला आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

मुख्य आरोपी रणजित पिसाळ यांनी सप्टेंबर 2013 मध्ये वर्तमानपत्रात नांदोशी, ता. हवेली येथे गजानन महाराज को. ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या मिळकत गट नंबर 202 येथील दोन एकर जागेवर बांधकाम करण्यासाठी निविदेची जाहिरात दिली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी पिसाळ यांना भेटून तेथे बांधकाम करण्याची परवानगी मागितली. मात्र त्यामध्ये भागिदार केल्यासच परवानगी देतो अशी अट पिसाळ यांनी टाकल्याने महांगरे यांनी त्यांना बांधकामात भागिदार म्हणून घेतले. त्यासाठी महांगरे यांनी आरोपी यांच्याशी पैशांच्या स्वरुपात व्यवहार केला व बांधकामही केले. अशा प्रकारे त्यांचा दोन कोटी 17 लाख तीन हजारांचा खर्च झाला. परंतु, आरोपी यांनी परत त्याच जागेवर वर्तमानपत्रामध्ये बांधकाम करण्याची निविदाची जाहिरात एप्रिल 2015 मध्ये दिली. महांगरे यांचे पैसेही परत केले नाहीत, म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी दिली. त्यांना अ‍ॅड. रविंद्र मुदगले यांनी सहकार्य केले.