Mon, Jul 22, 2019 01:00होमपेज › Pune › शहरात एकूण १९ अनधिकृत शाळा

शहरात एकूण १९ अनधिकृत शाळा

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:12AMपिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे तब्बल 19 शाळा सुरू आहेत. त्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाचा प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी सोेमवारी (दि. 11) केले आहे. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास पाल्याच्या होणार्‍या शैक्षणिक नुकसानीस शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

शहरात सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात खासगी प्राथमिक शाळांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत आहेत. संबंधित अनधिकृत शाळा बंद करण्याबाबत संबंधित संस्थांना नोटीसही दिलेल्या आहेत. असे असतानाही या शाळा अनधिकृतरित्या सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. शहरात असे एकूण 19 शाळा असून, त्यातील 18 शाळा इंग्रजी माध्यमाचा व एक शाळा मराठी माध्यमाची आहे. 

शहरातील पालकांनी आपल्या पाल्यास या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये. या अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक नुकसानीस ते स्वत: जबाबदार राहतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित अनधिकृत शाळांवर 19 ऑक्टोबर 2010 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालिका प्रशासनास जाग

बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे प्रवेश मे महिन्यांत पूर्ण होतात. त्या पूर्वी शहरातील अनधिकृत शाळांची यादी पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध होणे अत्यावश्यक होते. मात्र, ही यादी सोमवारी (दि.11) शिक्षण विभागातर्फे घोषित केली गेली आहे. शाळा शुक्रवार (दि.15) सुरू होणार आहे. 

शाळा सुरू होण्यापूर्वी 4 दिवस अगोदर अनधिकृत शाळांची नावे घोषित करून शिक्षण विभागाने काय साध्य केले, असा सवाल संतप्त पालक करीत आहेत. संबंधित अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळा सुरू होण्याचा तोंडावर अधिकृत शाळांमध्ये प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. परिणामी, त्यांचे वर्षे वाया जाण्याची शक्यता आहे. 

अधिकृत शाळाची नावे अशी आहेत

ग्रँड मीरा स्कूल, मोशी. स्मार्ट स्कूल, प्राधिकरण-मोशी. इंद्रायणी स्कूल, साई पार्क, दिघी. बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कूल, मोशी. मास्टर केअर स्कूल, आळंदी रस्ता, भोसरी. कमल प्रतिष्ठान माऊंट लिटराज स्कूल, वाकड. ग्रँड मीरा स्कूल, चिखली. जयश्री स्कूल, चर्‍होली. मरिअम स्कूल, भोसरी. ज्ञानराज स्कूल, कासारवाडी. बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी. सेंट मेरीज ज्युनिअर प्रायमरी स्कूल, पिंपळे निलख. माउंट कारमल पब्लिक स्कूल, सांगवी. शुंभकरोती इंटरनॅशनल स्कूल, गांधीपेठ, चिंचवड. एंजल्स स्कूल, पिंपळे निलख. मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी. ब्ल्यू रोज इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड. पर्ल ड्रॉप स्कूल, पिंपळे निलख. (सर्व इंग्रजी माध्यम). बालगोपाळ माध्यमिक शाळा, पिंपरी. (मराठी माध्यम).