Fri, Mar 22, 2019 05:35
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › राज्यात बांधणार 19 नवी कारागृहे

राज्यात बांधणार 19 नवी कारागृहे

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 12 2018 1:08AMपुणे : विजय मोरे/पुष्कराज दांडेकर

राज्यातील कारागृहांत शेळ्या-मेंढ्याप्रमाणे कैदी डांबण्यात आलेले असून, एकूण 54 कारागृहांची कैदी क्षमता 23 हजारांची असताना प्रत्यक्षात 33 हजार कैदी डांबलेले आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात कैद्यांना ठेवण्यासाठी तुरुंगच मिळणार नसल्याने शासनाने राज्यात 19 कारागृहे नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तर नऊ कारागृहांत बंदी संख्या वाढविण्यासाठी बरॅक बांधली जाणार आहेत.

राज्यातील 54 कारागृहांपैकी मध्यवर्ती कारागृहांची संख्या नऊ तर 45 जिल्हा कारागृहे आहेत. याच कारागृहांतर्गत खुले कारागृह, महिला कारागृह, किशोर सुधारगृह, प्रत्येकी एक कारागृह रुग्णालय आहे. या सर्व कारागृहांची बंदी क्षमता 23 हजार  942 इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात यात 32 हजार 810 कैदी डांबून ठेवले आहेत. यामध्ये 31 हजार 396 पुरुष, 1414 महिला कैद्यांचा समावेश आहे.राज्यातील या कारागृहांमध्ये शिक्षा झालेले 8260 कैदी आहेत. मात्र न्यायाधीन बंदीची संख्या तब्बल 23 हजार 30 पर्यंत असून, रोज यामध्ये वाढच होत आहे. राज्यात गुन्हेगारीचा आलेख वाढतच आहे. न्यायालयातील प्रलंबित खटल्यांमुळे कैद्यांना कारागृहातच डांबून ठेवावे लागत आहे. 

त्यामुळे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांचीच संख्या तब्बल 24 हजार 138 पर्यंत गेली आहे. ही कारागृहे ओव्हर फ्लो होण्यात प्रलंबित खटले हे मुख्य कारण आहे. प्रलंबित खटल्यांमुळे कच्च्या कैद्यांचीसंख्या प्रचंड वाढली आहे. यामध्ये काही कैद्यांना सराईत गुन्हेगारांसोबत जबरदस्तीने राहावे लागत असल्याने, मुळात गुन्हेगार नसलेले कैदी सराईत गुन्हेगार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 
येरवडा कारागृहांची कैदी क्षमता 2 हजार 449 आहे. प्रत्यक्षात या कारागृहात 5 हजार 238 बंदी ठेवलेले आहे. हे प्रमाण 137 टक्के इतके आहे. भविष्यकाळात प्रलंबित खटल्यांमुळे या कैद्यांची संख्या कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने जेल प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत, नवी कारागृहे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

पंधरा दिवसापूर्वी याला मंजूरी देण्यात आली असून, या प्रस्तावा अंतर्गत राज्यातील वीस कारागृहांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये येरवडा, सातारा, सांगली, अहमदनगर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, नांदेड, हिंगोली, बीड, भुसावळ, ठाणे, मुंबई या मध्यवर्ती कारागृहामध्ये नवीन बांधण्यात येणार आहेत. तर अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा, वाशिम या मध्यवर्ती कारागृहात बंदी क्षमता वाढविण्यासाठी नव्याने बॅरेक बांधली जाणार आहेत.

येरवडा कारागृहात नव्या आठ बॅरॅक बांधली जाणार असून, कैद्यांची क्षमता 200 नी वाढणार आहे. ठाणे, मध्यवर्ती कारागृहात सहा, औरंगाबाद कारागृहात 16 बॅरेक बांधण्याचे काम सुरू झाले आहे. अहमदनगर जिल्हा कारागृहासाठी नारायण डोह या गावातील अकरा एकर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. या कारागृहाचे काम पोलिस गृहनिर्माण महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. नवीन गोंदिया जिल्हा वर्ग दोन कारागृह बांधण्यासाठी सुमारे नऊ हेक्टर जागा निश्‍चित करण्यात आली असून, कारागृह बांधकाम निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मुंबई येथे मंडाळे गावात पाच हेक्टर जागेवर मोठे कारागृह बांधण्यात येणार आहे.

90 कैद्यांसाठी खुले कारागृह

कारागृहात सद्वर्तन ठेवणार्‍या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवले जाते. या कैद्यांकडून शेती कामाबरोबरच कलाकुसरीची कामे करून घेतली जातात. अशा कैद्यांसाठी नव्याने सहा कारागृहे बांधली जाणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग, वर्धा, धुळे, यवतमाळ, लातूर आणि रत्नागिरी जिल्हा कारागृहांचा समावेश आहे. या खुल्या कारागृहाची कैदीक्षमता प्रत्येकी पंधरा राहणार आहे.