Tue, Jul 23, 2019 17:05होमपेज › Pune › पेइंग गेस्ट हाउस व्यवसायाच्या आमिषाने १९ लाखांची फसवणूक

पेइंग गेस्ट हाउस व्यवसायाच्या आमिषाने १९ लाखांची फसवणूक

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 12:55AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

औरंगाबाद येथे आपले पेईंग गेस्ट हाउस असल्याची बतावणी करत विमाननगर येथे पेईंग गेस्टचा व्यवसाय भागीदारीत सुरू करण्याचे आमिष दाखवून विश्‍वास संपादन करत तरुणाने एकाला 19  लाख 84 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नीलेश होनकळस (वय 30, रा. थिटे वस्ती, खराडी) यांनी विमानतळ पोलिसांत फिर्याद दिली आहे, तर  गणेश सुबेराव गोरे (वय 26, रा .नाळवंडी, ता. बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी होनकळस हे पुण्यातील खराडी परिसरातील  नामांकित कंपनीत नोकरीस आहेत. मार्च 2017 मध्ये होनकळस यांना कार खरेदी करावयाची असल्याने ते एका कार शोरूममध्ये गेले होते. त्यावेळी आरोपी गोरे हादेखील तेथे होता.  तेथे दोघांची भेट झाली. त्यानंतर गोरे यांच्यासोबत फिर्यादी यांची ओळख झाली. गोरे हा मूळचा बीड येथील राहणारा असून त्याचा औरंगाबादला ‘पीजी’ व्यवसाय असल्याचे सांगितले.

फिर्यादी यांची आईदेखील बीड येथील असल्याने त्यांची चांगलीच ओळख झाली. त्यानंतर त्याचे होनकळस यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. त्यानंतर त्याने होनकळस आणि त्यांच्या आईचा विश्‍वास संपादन केला. माझा औरंगाबाद येथे ‘पीजी’ व्यवसाय आहे. तसाच व्यवसाय विमाननगर येथे भागीदारीत सुरू करू असे आमिष दाखवले. त्यांच्याकडून या व्यवसायासाठी 18 लाख रुपये रोख घेतले.

त्यानंतर औरंगाबाद येथील गेस्ट हाऊसची डागडुजी करावयाची आहे, असे सांगून होनकळस यांच्याकडून एक लाख 84 हजार रुपयांचे सोने घेतले. मात्र त्यानंतर तो पसार झाला आणि असा कोणताही व्यवसाय सुरू न करता एकूण 19 लाख 84 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मार्च 2017 ते 1 डिसेंबरदरम्यान घडला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ए. एम. आठरे करीत आहेत.