Sat, Mar 23, 2019 01:57होमपेज › Pune › स्वाईन फ्लूचे 11 दिवसांत तब्बल 19 रुग्ण

स्वाईन फ्लूचे 11 दिवसांत तब्बल 19 रुग्ण

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 10:24PMपिंपरी : प्रदीप लोखंडे

शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. 9 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या 11 दिवसांत स्वाईन फ्लूचे तब्बल 19  पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.  यंदाच्या वर्षी 3 हजार 732 रुग्णांना टॅमी फ्लूचे वाटप करण्यात आले आहे.  एकूण 92 जणांच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. वाढत्या स्वाईन फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. 

स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार आहे. थंडीमध्ये पोषक वातावरण असल्यामुळे  स्वाईन फ्लूची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 2016 मध्ये सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी 2017 मध्येही संख्या कमी होती. गेल्या दोन वर्षात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत घट असल्याचे चित्र होते; मात्र 2018 मध्ये पुन्हा ही संख्या वाढत आहे. आठवड्यात किमान पाच ते सहा रुग्ण आढळत आहेत. या वर्षी आठ महिन्यांत 92 घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. 37 हजार 804 सर्दी, तापाचे रुग्ण आढळले आहेत. 3 हजार 732 रुग्णांना टॅमी फ्लूचे वाटप करण्यात आले आहे. 19  रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये दोघांचा मृत्यूही झाला आहे. तीन रुग्णांनी व्हेंटिलेटवर उपचार घेतले आहेत. 9 रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून चार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

जानेवारी ते जुलै 2018 पर्यंत स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत घट असल्याचे चित्र होते. ऑगस्ट महिन्यात ही संख्या वाढताना दिसत आहे. 9 ते 20 ऑगस्टपर्यंत 19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका महिलेचा मृत्यूही झाला आहे. एक दिवसाआड किमान दोन तरी रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

स्वतंत्र वॉर्ड नाहीत

स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यास महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करण्यात आले नाहीत. शासनाचे आदेश असल्यामुळे हे वॉर्ड केले नसल्याचे रुग्णालयीन प्रशासन सांगत आहे; मात्र स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जात आहेत.

स्वाईन फ्लूबाबत जनजागृती नाही

स्वाईन फ्लूने एका रुग्णाचा मृत्य झाल्याची घटना शहरात घडली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका रुग्णालयांतर्गत स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्व स्टाफ, डॉक्टरांना याबाबत सूचना देणे गरजेचे आहे; मात्र वैद्यकीय विभागकडून कोणतीच जनजागृती केली जात नसल्याचे चित्र आहे.