Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Pune › 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताचे पुरुष व महिला कबड्डी संघ जाहीर

18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताचे पुरुष व महिला कबड्डी संघ जाहीर

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 12:44AMपुणे ः प्रतिनिधी

18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेकरिता दुबई मास्टर कबड्डी स्पर्धा गाजविणारे महाराष्ट्राचे गिरीश इरनाक व रिशांक देवाडीगा हे  दोन शिलेदार यांची पुन्हा एकदा भारतीय कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे. तर पुण्याची सायली केरीपाळे हिची महिला संघात निवड जाहीर झाली आहे.

रेल्वेकडून खेळणारी महाराष्ट्राची सोनाली शिंगटे हिचादेखील महिला संघात समावेश झाला आहे. जकार्ता (इंडोनेशिया) येथे दि. 18ऑगष्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यात कबड्डी स्पर्धा 19 ते25ऑगष्ट या दरम्यान असून दुबई येथील स्पर्धेत खेळलेले सुरजित, सुरींदर नाडा,मनजीत चिल्लर यांना वगळण्यात आले असून तेलंगणाचा मल्लेश गंगाधर याची पुरुष संघात वर्णी लागली आहे. भारतीय पुरुष व महिला संघाची आज घोषणा करण्यात आली.

अपेक्षेप्रमाणे पहिला सुपर टेन करणारा रिशांक व दोन वेळा हाय-फाय करणारा गिरीश या दोन महाराष्ट्राच्या शिलेदारानी या भारतीय संघात पुन्हा एकदा स्थान मिळविले आहे. दुबईत पाकिस्तान बरोबर झालेल्या पहिल्या सामन्यात या दोघांना संधी मिळाली नव्हती. पण त्यानंतर मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करीत या दोघांनी आपली निवड सार्थ ठरविली. यापुढील सर्वच सामन्यात त्यांनी आपल्या जोशपूर्ण खेळणे भारतीय निवड समितीला त्यांच्या नावाचा विचार करण्यास भाग पाडले. या निवडीमुळे महाराष्ट्राच्या कबड्डी वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. चे अध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर, सचिव आस्वाद पाटील व सर्व पदाधिकार्‍यानी या चौघांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

जाहीर झालेला भारतीय संघ पुढीलप्रमाणे ः पुरुष संघ : 1) गिरीश इरनाक (महाराष्ट्र), 2) दीपक हुडा (राजस्थान), 3) मोहित चिल्लर (भारतीय रेल्वे), 4) संदीप नरवाल (हरियाणा), 5) प्रदीप नरवाल(उत्तराखंड), 6) गिरीश इरनाक (महाराष्ट्र), 7) मोनू गोयत (सेनादल), 8) अजय ठाकूर (हिमाचल प्रदेश), 9) रोहित कुमार (सेनादल), 10)राजू लाल चौधरी (राजस्थान), 11) मल्लेश गंगाधर (तेलंगणा), 12) राहुल चौधरी (उत्तर प्रदेश). राखीव : 1)अमित नांगर (दिल्ली), 2) मनिंदरसिंग (पंजाब).

महिला संघ : 1)साक्षीकुमारी (हरियाणा), 2) कविता, 3)प्रियांका (दोघी हिमाचल प्रदेश), 4) मनजीत कौर (राजस्थान), 5) पायल चौधरी, 6) रितू नेगी, 7) सोनाली शिंगटे (तिन्ही भारतीय रेल्वे), 8) सायली केरीपाळे (महाराष्ट्र), 9) रणदीप कौर खेरा (पंजाब), 10) शालिनी पाठक (राजस्थान), 11) उषाराणी नरसिंह (कर्नाटक), 12) मधू (दिल्ली). 
राखीव : 1) प्रियांका (हरियाणा), 2) शमा परवीन (बिहार).