Tue, Mar 19, 2019 12:06होमपेज › Pune › पुणे : भोसरीमध्ये १६ कारसह १८ वाहनांची तोडफोड ; पाच ताब्यात

पुणे : भोसरीमध्ये १६ कारसह १८ वाहनांची तोडफोड ; पाच ताब्यात

Published On: Jun 11 2018 4:49PM | Last Updated: Jun 11 2018 4:51PMपिंपरी : प्रतिनिधी

भोसरीमधील गव्हाणे वस्ती येथे वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या. १६ जणांच्या टोळक्याने मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास १८ वाहनांची तोडफोड केली. तोडफोडीमध्ये १६ कार गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून १६ अज्ञातांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल हनुमंत कदम (वय ३३, रा. जैन शांतिनिवास जवळ, आदिनाथनगर, भोसरी)  यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम यांनी रामनगर हौसिंग सोसायटीजवळ सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला त्यांची कार नेहमीप्रमाणे लावली होती. कार लावून जात असताना पाच-सहा दुचाकीवरून आलेल्या १६ जणांनी कारची मोडतोड केली. लाकडे दांडके, लोखंडी गज, कोयत्याचे सहाय्याने कारची तोडफोड करण्यात आली आहे. याबरोबरच परिसरातील अन्य १७ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. 

परिसरात आरडाओरडा करून सर्वजण प्रभू रामचंद्र सभागृहाच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर कदम यांनी पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकारची माहिती दिली. माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पहाटे तीन वाजता प्रकारातील ५ जणांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बुचडे तपास करीत आहेत.