Tue, May 26, 2020 01:16होमपेज › Pune › स्वच्छता सर्वेक्षण तयारीसाठी पालिकेकडून १८ लाख खर्च

स्वच्छता सर्वेक्षण तयारीसाठी पालिकेकडून १८ लाख खर्च

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 25 2017 12:53AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या पथकाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छ शहर स्पर्धेसाठी 4 ते 6 जानेवारी 2018 या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण 18 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

केंद्रीय पथकाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात पुढील महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारचे शहरी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि मिशन निदेशक यांनी स्वच्छ शहर अभियान राबविण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार, शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत शहरात विविध वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतेबाबत संदेश देणारे फ्लेक्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. मेळावे, पथनाट्ये घेण्यात येत आहेत; तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागृती स्वच्छता रॅली काढली जात आहे. विद्यार्थी व नागरिकांना केंद्र शासनाचे स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी मार्गदर्शन मेळावे घेण्यात येत आहेत; तसेच महापालिकेच्या कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षण दिले गेले आहे. 

स्वच्छतेसंदर्भात चित्रफीत तयार केली जाणार आहे. विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांसाठी रिक्षा, माईक, साऊंड सिस्टीम, बक्षिसे, कलावंत मानधन असा खर्च होणार आहे. या सर्व उपक्रमांसाठी 17 लाख 73  हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चास स्थायी समितीच्या मागील सभेत आयत्या वेळी मंजुरी देण्यात आली.