होमपेज › Pune › शहरातील 17 खासगी शाळा अनधिकृत

शहरातील 17 खासगी शाळा अनधिकृत

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 12:54AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील इंग्रजी, मराठी, उर्दू माध्यमाच्या 17 खासगी शाळा अनधिकृतरीत्या सुरू असल्याचे समोर आले आहे. या शाळांची यादीच महापालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली असून, त्यात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, शाळा सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतर ही यादी जाहीर होत असल्याने संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांपुढे मोठा पेच निर्माण होणार आहे.

परवानगी न घेता शाळा चालविणार्‍या संस्थांची तपासणी करून त्यांची यादी महापालिकेच्या शिक्षण विभागाने 31 मेपूर्वी जाहीर करणे बंधनकारक आहे; तसेच संबंधित अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नये, यासाठी जनजागृती करणेही आवश्यक आहे. मात्र, यावर्षी शिक्षण विभागाकडून अशी यादीच जाहीर करण्यात आली नव्हती. आता शाळा सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतर 17 अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

अन्य शाळांमध्ये कधीही प्रवेश

अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब झाला असला तरी अन्य शाळांमध्ये कधीही प्रवेश घेता येतो. महापालिकेच्या कोणत्याही शाळेत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.

- धनंजय परदेशी, सहायक शिक्षण प्रमुख, पुणे मनपा