Sun, Jul 21, 2019 08:24होमपेज › Pune › सुगम-दुर्गम बदल्यांना 17 मेची डेडलाइन

सुगम-दुर्गम बदल्यांना 17 मेची डेडलाइन

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील जिल्हा परिषदेच्या जिल्हाअंतर्गत सुगम-दुर्गम बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून, बदली प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत धुळे, बुलडाणा, जळगाव, सातारा, कोल्हापूर, वाशिम, सोलापूर या जिल्ह्यांतील शिक्षकांच्या बदलीच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत; तर आज सोमवार दि.14 रोजी पुण्यासह दहा जिल्ह्यांच्या याद्या जाहीर होतील. तसेच मंगळवारी उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या जाहीर होणार आहेत. येत्या 17 मेपर्यंत जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रियाच पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.राज्यात सुगम-दुर्गम भागातील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या आणि आंतरजिल्हा बदल्या यावरून गेले वर्षभर चांगलेच वातावरण तापले होते. बदलीसाठी दुर्गम भागातील शिक्षकांनी ‘बदली हवी’ कृती समितीची स्थापना 

करून, समितीचे प्रदेशाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बदलीसमर्थनार्थ मोर्चे काढले. तर राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली बदली प्रक्रियेत सुधारणा व्हावी यासाठी मोर्चे काढले. परंतु यंदा प्रशासनाने कोणताही दबाव न घेता अखेर बदली प्रक्रिया पार पाडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आंतरजिल्हा आणि जिल्हाअंतर्गत अशा दोन्ही टप्प्यांवर या बदल्या होताना दिसत आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदली प्रक्रिया ही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राबविण्यात येत आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी या आदेशाद्वारे शिक्षकांना कार्यमुक्त करावे लागणार आहे. बदली झालेल्या शिक्षकांना दुसर्‍या दिवशी लगेच बदली झालेल्या शाळेत तत्काळ रुजू व्हावे लागणार आहे. 
बदली झालेल्या शिक्षकांचा रुजू झाल्याबाबतचा अहवाल त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी बदलीने नियुक्ती दिलेल्या शाळेवर हजर न झाल्यास, अशा शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना बदलीप्राप्त शाळेवर हजर व्हावे लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येत्या 17 मेची डेडलाईन देण्यात आली आहे.

चुकीची माहिती देणार्‍या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई...

जिल्हाअंतर्गत आणि आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना रुजू करून घेत असताना, जर शिक्षकांनी स्टाफ व ट्रान्सफर पोर्टलवर भरलेली माहिती व रुजू करताना कागदपत्रांची पडताळणी करताना दिसून आलेली माहिती यात फरक दिसून आला व त्यामुळे शासनाची फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यास संबंधित शिक्षकांना नवीन जिल्ह्यात रुजू करून न घेता पुन्हा मूळ जिल्ह्यात परत पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मूळ जिल्ह्याद्वारे अशा शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना आपल्या जिल्ह्यात रिक्त पद असणार्‍या शाळेत पदस्थापना देण्यात येणार आहे. तसेच अशा शिक्षकांना पुढील पाच वर्षे कोणत्याही बदली प्रक्रियेत अर्ज करता येणार नसल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.