होमपेज › Pune › हरभरा पिकासाठी १७.७० कोटींचा निधी

हरभरा पिकासाठी १७.७० कोटींचा निधी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत (एनएफएसएम) कडधान्य पिकांतर्गत हरभरा पिकासाठी निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 कोटी 69 लाख 68 हजार रुपयांचा निधी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आला आहे. हरभरा बियाण्यास किलोस 25 रुपये अनुदान आहे. 

योजनेचा अधिकाधिक शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विस्तार संचालक डॉ. सु. ल. जाधव यांनी केले आहे. राज्यात हरभरा पिकाखाली सरासरी क्षेत्र 13 लाख हेक्टर इतके आहे. त्यापैकी अनुदानित बियाण्यांमधून दोन लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा बियाणे पेरणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. चालू वर्षी मुबलक पावसामुळे पाण्याची उपलब्धता अधिक आहे. त्यामुळे हरभरा पिकास त्याचा फायदाच होऊन उत्पादन चांगले हाती येण्याची अपेक्षा आहे. 

अनुदानित बियाण्यांमधून हरभर्‍याचे 1 लाख 62 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व जिल्हा स्तरावर बियाणे वितरण वेळेत करण्यात आल्याने सरासरी क्षेत्रापेक्षा पेरा वाढण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. खरीप हंगामात पावसामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झालेला आहे; तर कापसावरील बोंडअळीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अभियानांतर्गत कडधान्य पिकांसाठी केंद्र हिश्श्याचे 13 कोटी 12 लाख 50 हजार रुपये आणि राज्य हिस्सा 8 कोटी 75 लाख रुपयांचा एकत्रित निधी 21 कोटी 87 लाख 50 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात येत असून, वैयक्तिक शेतकरी, गटांनाही हरभरा अनुदानित दरावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हरभरा बियाण्याचा किलोचा दर 87 रुपये आहे. त्यामध्ये अनुदान प्रतिकिलोस 25 रुपये असून शेतकर्‍यांना योजनेतील खरेदीत हरभरा बियाणे किलोस 62 रुपये भावाने उपलब्ध होईल. या बाबत महाबीजच्या वितरकांकडेही शेतकर्‍यांनी मागणी केल्यास त्यास बियाणे उपलब्ध होण्यात अडचण येणार नाही. अधिक माहितीसाठी शेतकर्‍यांनी कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.